‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीत तरुणांकडून संताप व्यक्त; अकबर, बाबर रोडच्या फलकांना फासलं काळं

Delhi News | बॉलीवूड अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर औरंगजेबाविरोधात अनेकांच्या मनात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यातच आता काही युवकांनी दिल्लीतील अकबर रोड आणि हुमायूं रोडवरील बोर्डांना काळे फासले आहे. तसेच या रस्त्यांची नावे बदलण्याची मागणी केली आहे.
यावेळी तरुणांकडून जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथके आणि दिल्ली महानगरपालिकेचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहचले असून पोलीस अधिकाऱ्यांकडून त्या युवकांचा शोध घेतला जात आहे. तसेच दिल्ली पोलीस कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा छावा चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. संभाजी महाराजांवर क्रूरपणे औरंगजेबने केलेले अत्याचार पहिल्यावर युवा पिढी संतप्त होत आहे. त्याचे पडसाद देशभरात दिसत आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये छावा चित्रपट पाहताना एका युवकाने सिनेमागृहाच्या पडद्याकडे धाव घेत पडदा फाडून टाकला. या चित्रपटाद्वारे देशभरातील युवकांपर्यंत संभाजी महाराजांचा इतिहास पोहचल्याने अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेते विकी कौशल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहे. या चित्रपटाने रिलीजच्या एका आठवड्यात 200 कोटी रुपयांची कमाई केली होती.
हेही वाचा:





