Moshi building collapse : वायसीएमबाहेर आक्रोश… अश्रूंनी भरला परिसर!
Moshi building collapse : मोशी दुर्घटनेनंतर चार दिवसांच्या प्रतिक्षेचा दुर्दैवी शेवट

पिंपरी – मोशी कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेनंतर तब्बल ७२ तास सुरू असलेल्या शोधमोहिमेचा दुर्दैवी शेवट यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) परिसरात पाहायला मिळाला.
एकामागून एक मृतदेह रुग्णालयात दाखल होताच कुटुंबीयांचा आक्रोश, अश्रू आणि हंबरड्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला. अनेकांच्या डोळ्यांसमोर आपल्या जिवाभावाच्या व्यक्तीचे पार्थिव येताच वातावरण अधिकच हृदयद्रावक बनले.
११ जुलै रोजी दुपारी २.३० वाजल्यापासून मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणण्यास सुरुवात झाली. रात्री ८ वाजेपर्यंत सहा मृतदेह रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर १२ जुलै रोजी आणखी एका मृतदेहाचा शोध लागला. अद्याप दोन जणांचा शोध सुरू असल्याने कुटुंबीयांची धाकधूक कायम होती.
मृतदेह काळ्या रंगाच्या शवपिशव्यांमधून रुग्णालयात आणले जात होते. त्या क्षणी परिसरात पसरलेली शांतता आणि नातेवाईकांचा हंबरडा उपस्थितांच्या काळजाला चिरणारा होता. काही कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते, तर अनेकजण शब्दही न उच्चारता आपल्या आप्तांच्या प्रतीक्षेत उभे होते.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकारी, डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी आणि आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून होती.मोशी दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हिरावून घेतला.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाबाहेर दिसणारे अश्रू, आक्रोश आणि हतबल चेहरे या दुर्घटनेची भीषणता सांगण्यासाठी पुरेसे होते.
– ८ जुलै : दुर्घटना घडली.
– ११ जुलै दुपारी २.३० पासून मृतदेह वायसीएममध्ये दाखल होण्यास सुरुवात.
– ११ जुलै रात्री ८ वाजेपर्यंत सहा मृतदेह दाखल.
– अद्याप दोन जणांचा शोध सुरू
८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोशी कचरा डेपोतील कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन होऊन ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळले. त्या वेळी इमारतीत २३ कामगार होते. या दुर्घटनेत अनेक जण कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले. शोधमोहीमेत नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर मृतांचा शोध सुरूच होता.




