नाशिकमध्ये गुन्हेगारीचा उद्रेक, माजी सरपंचावर क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला, परिसरात खळबळ

नाशिक : नाशिकच्या बागलाण तालुक्यातील नवे निरपूर गावात एका क्षुल्लक वादातून माजी सरपंच मुन्ना सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात सूर्यवंशी गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्रथम सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या घटनेने स्थानिक प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवे निरपूर गावात रस्त्याच्या कामासाठी लोकसहभागातून मुरूम टाकण्याचे काम सुरू होते. या कामादरम्यान, “आम्हाला का विचारले नाही?” या क्षुल्लक कारणावरून काही व्यक्तींमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद टोकाला गेल्याने एका संतप्त व्यक्तीने माजी सरपंच मुन्ना सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात सूर्यवंशी यांना गंभीर दुखापत झाली, आणि रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, हल्लेखोरांचा शोध अद्याप लागलेला नाही. या प्रकरणी पोलिसांनी गावातील काही संशयितांची चौकशी सुरू केली असून, लवकरच आरोपींना ताब्यात घेण्याचा दावा केला आहे.





