Pune News : हांडेवाडीत गुन्हेगारीचा उद्रेक, वेश्याव्यवसाय, चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस चौकीची मागणी

फुरसुंगी : हवेली तालुक्यातील हांडेवाडी परिसराचे मोठ्या झपाट्याने नागरीकरण होत असताना या भागात अनेक मोठे व्यावसायिक व वेअर हाऊसिंग झाले आहे. त्या अनुसंघाने येथे सतत छोटे-मोठे अपराध घडत असून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी व अवैध धंदे वाढू लागले आहेt. त्यामुळे येथील महिला वर्ग व सर्व सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर फुरसुंगी पोलीस ठाण्याअंतर्गत हांडेवाडी या ठिकाणी स्वतंत्र पोलीस चौकीची निर्मिती करावी अशी मागणी हवेली तालुका युवा मोर्चा भाजपा अध्यक्ष सचिन हांडे यांनी केली आहे. याबाबत सचिन हांडे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांना लेखी निवेदन दिले आहे .
हांडेवाडी परिसराचे झपाट्याने नागरीकरण झाल्याने मोठी लोक वस्ती झाली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अहोरात्र अवजड वाहनांच्या वर्दळीने वाहणारा मंतरवाडी कोंढवा बाह्यवळण मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून रात्रीच्या वेळेला व दिवसाढवळ्या सहजीवन वाडी परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या राहत असल्याने स्थानिक महिलांना बस थांब्यावर उभे राहणेही मुश्किल झाले आहे.
त्यामुळे या वेश्याव्यवसायाला पायबंध घालायचा असेल तर पोलीस चौकीचे नितांत गरज निर्माण झाली आहे. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा स्टील व्यवसायिकांची गोदामी आहे. त्यामुळे अवजड वाहनांची मोठी वर्दळ असून अनेकदा वाद विवाद व भांडणे होत असतात. तसेच रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या, टायर व इतर साहित्य चोरून नेण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
तरी या भागासाठी गेल्या सहा महिन्यापूर्वी नव्याने निर्माण झालेल्या फुरसुंगी पोलीस ठाण्यांतर्गत हांडेवाडी पोलीस चौकीची निर्मिती झाल्यास या भागातील गुन्हेगारी, अवैध धंदे, तंटे, हाणामाऱ्या, चोऱ्या माऱ्या कमी होण्यास मदत होईल त्यामुळे हांडेवाडी परिसरात तातडीने पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी हवेली तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन हांडे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत बोलताना फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे म्हणाले की, हांडेवाडी येथे तातडीने पोलीस चौकीची निर्मिती करण्यास आम्ही केव्हाही तयार आहे. मात्र पोलीस चौकी निर्मिती करण्यास गावातील काही लोक अनेक अनुकूल आहेत. तर काही लोक विरोध करत असल्याने थोडा विलंब होत आहे. तरी ग्रामस्थांशी चर्चा करून एक मताने लवकरात लवकर हांडेवाडी येथे पोलीस चौकीची निर्मिती केली जाईल असे त्यांनी सांगितले.





