Pune District : कामगंध सापळ्यांद्वारे लष्करी अळीचा बंदोबस्त करा

पळसदेव : रब्बी हंगामातील मका पिकावर पडणार्या लष्करी अळीच्या प्रादुर्भावाबाबत कृषी अधिकार्यांनी रुई (ता. इंदापूर) शेतकर्यांच्या बांधावर जाऊन उपाययोजना बाबत शेतकर्यांना मार्गदर्शन केले. मका पिकाचे लष्करी अळीपासून संरक्षण बाबत मार्गदर्शन केले.
संपूर्ण तालुक्यात तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली लष्करी अळीपासून संरक्षण बाबत शेतकर्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळ अधिकारी भिगवण किरण पिसाळ यांनी दिली.सध्या रुई येथे मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक यांनी शेतकर्याच्या बांधावर जाऊन शेतकर्यांना उपायोजनांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी किरण पिसाळ यांनी शेतकर्यांना माहिती देताना सांगितले की, कामगंध सापळ्यांचा वापर करून मका पिकावरील लष्करी अळीचे नियंत्रण करणे, मेटारायझियम या जैविक बुरशीचा वापर करणे तसेच पाच टक्के निंबोळी अर्क फवारणी करावी. लष्करी अळीचे नियंत्रण शेतकर्यांनी मोहीम स्वरूपात केले असल्याने प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली आहे जर नुकसान आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेले तर इमामेक्टिन बेंजोएट एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे असे आवाहन केले.
यावेळी कृषी पर्यवेक्षक जी. डी. खंडागळे यांनी उपस्थित शेतकर्यांना ऊस पाचट व खोडवा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले तसेच ड्रोन प्रात्यक्षिका द्वारे पिकांवर कीटकनाशक बुरशीनाशक व अन्नद्रव्यांचे फवारणी विषयी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी किरण पिसाळ, कृषी सहाय्यक प्रशांत मोहोळकर, कृषी पर्यवेक्षक जी. डी. खंडागळे तसेच रुई गावातील शेतकरी उपस्थित होते.





