पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत आमचीच सत्ता

पिंपरी -राज्यात भाजप-शिवसेना एकत्र आहे. त्यामुळे आम्ही (शिंदे-फडणवीस) सरकार मुंबई महापालिकेसह पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदाही जिंकू असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
रहाटणीतील एसएनबीपी या शिक्षण संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी केसरकर यांनी बुधवारी संवाद साधला. त्याचबरोबर पिंपरी महापालिका क्षेत्रातील विज्ञान अविष्कार नगरी (सायन्स सिटी) उभारण्याबाबत अधिकाऱ्यांसमेवत स्थळपाहणी केली. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यावेळी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, आम्ही मुळातच भाजप-शिवसेना एकत्र आहोत. अगदी मुंबई महापालिकेत आमचे 150 पेक्षा जास्त अस्तिवातले नगरसेवक आहेत. त्याच्यामुळे आम्ही मुंबई महापालिका, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, सगळ्या नगरपालिका, जिल्हा परिषदा सुद्धा जिंकू. शिवसेना आणि शिंदे गटातील न्यायालयीन प्रक्रियेबाबत बोलताना ते म्हणाले, न्यायालयाच्या कामकाजाबाबत काही बोलणार नाही. लोकशाही मजबूत करणारे निकाल असतील अशी मला खात्री आहे.
दसरा मेळाव्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील
शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांचा की शिंदे गटाचा होणार याबाबत विचारले असता मंत्री केसरकर म्हणाले, आमचे मुख्यमंत्री खूप काम करतात. लोकांच्या आनंदात सहभागी होतात. दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री शिंदे घोषणा करतील. मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ट आहेत. म्हणून बाळासाहेबांच्या विचारासाठी जशा लढा दिला. तसेच त्यांच्या प्रथा-परंपरा कायम ठेवण्यासाठी ते कटिब्ध आहेत. दसरा मेळाव्याबाबत काय करायचे याच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांबद्दल त्यांना असलेला आदर आणि बाळासाहेबांची भूमिका, व्यापक हिंदुत्वाचे तत्व पुढे घेऊन शिंदेसाहेब चालत असल्याचे केसरकर म्हणाले.





