“आमचा नवीन नकाशा कायम राहणार त्यात काहीही बदल होणार नाही”

नवी दिल्ली : जगात एकीकडे कोरोनाशी लढा सुरु आहे तर दुसरीकडे भारताच्या सीमेवर नेपाळ आणि चीन दोघांकडून आपला दावा करणं किंवा मुजोरी करण्याचा प्रकार सुरु आहे. त्यात आता नेपाळने भारत चीनसोबत चर्चा करायला तयार आहे मग आमच्यासोबत चर्चा का करत नाही असा सवाल भारताला केला आहे. नेपाळचा नवीन नकाशा कायम राहणार असून त्यात काहीही बदल होणार नाही असे नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावाली यांनी म्हटले आहे. नेपाळने नवीन नकाशा जारी केला असून त्यात लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भारतीय प्रदेश नेपाळमध्ये दाखवले आहेत. नकाशामधील या बदलांना नेपाळच्या संसदेची मान्यता आवश्यकता आहे. त्यासाठी नेपाळच्या संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे.
नेपाळने लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. “नेपाळच्या नकाशामध्ये बदल करण्याला सर्वपक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा बदल कायम राहणार आहे” असे नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावाली यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्यामुलाखतीत त्यांनी हे सांगितले. पुढच्या आठवडयात ही सर्व संसदीय प्रक्रिया पूर्ण होईल असे ते म्हणाले. लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हा नेपाळचा भाग आहे. आमचा निर्णय कायम आहे. त्याबद्दल कुठलीही अस्पष्टता नाही. नेपाळचा भूप्रदेश कुठला आहे? त्यावर चर्चा झाली पाहिजे असे ग्यावाली यांनी म्हटले आहे. भारताने सीमावादाच्या मुद्दावर नेपाळबरोबर चर्चा करावी, यावर प्रदीप ग्यावानी यांचा भर आहे.
परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेसाठी आम्ही भारताला पत्र पाठवले होते. पण त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही असे ग्यावाली यांनी सांगितले. करोना व्हायरसच्या या संकटकाळात भारत सीमावाद सोडवण्यासाठी चीन बरोबर चर्चा करु शकतो. मग नेपाळबरोबर का चर्चा करत नाही? असा सवाल ग्यावाली यांनी उपस्थित केला. भारत आणि चीनच्या लष्करी कमांडर्सना आपण एकत्र बसून चर्चा करताना पाहिले आहे. हे भारत आणि चीनमध्ये घडू शकते. मग बांगलादेश, नेपाळबरोबर का चर्चा करत नाहीत असा नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांचा प्रश्न आहे.





