महिला सुरक्षित असतील तेव्हाच आपला भारत प्रगती करेल – राहुल गांधी

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद आणि उत्तराखंडमधील पौडी येथील महिला अत्याचारांच्या घटनांबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. देशातील महिला सुरक्षित असतील तेव्हाच भारताची प्रगती होईल असेही त्यांनी म्हटले आहे. उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यात भाजप नेत्याचा मुलगा आणि त्याच्या मालकीच्या रिसॉर्टमधील दोन कर्मचाऱ्यांना एका महिला रिसेप्शनिस्टच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.
या युवतीच्या हत्येत भाजप नेत्याच्या मुलाचा समावेश असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. तसेच मुरादाबादमध्ये एका महिलेला रस्त्यावर नग्नावस्थेत फिरताना दिसल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे 15 सेकंदाचे सीसीटीव्ही फुटेज बुधवारी ऑनलाइन समोर आले. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मुरादाबाद आणि उत्तराखंडमध्ये मुलींसोबत घडलेल्या घटनांनी सर्वांनाच धक्का बसला आहे, असे गांधी यांनी हिंदीत ट्विटमध्ये म्हटले आहे.”भारत जोडो यात्रेत, मी अनेक हुशार मुली आणि तरुणींना भेटत आहे, त्यांचे म्हणणे ऐकत आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, जेव्हा देशातील महिला सुरक्षित असतील तेव्हाच आपला भारत प्रगती करेल,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.





