Farmers’ Protest : शेतकऱ्यांसाठी आमचे दरवाजे सदैव खुले; सर्वोच्च न्यायालयाचे आंदोलकांना आवाहन

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी आमचे दरवाजे सदैव खुले आहेत. ते त्यांच्या सूचना किंवा मागण्या घेऊन थेट आमच्याकडे येऊ शकतात किंवा त्यांचा प्रतिनिधी पाठवू शकतात, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने एकप्रकारे शेतकरी आंदोलकांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.तसेच खनौरी सीमेवर आमरण उपोषण करणारे शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या प्रकृतीबाबतही न्यायालयाने पंजाब सरकारकडून उत्तर मागितले आहे.
या प्रकरणी न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्जल भुईया यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, डल्लेवाल यांना काही झाले, तर ते राज्य सरकारसाठी चांगले होणार नाही. त्यांना सर्व वैद्यकीय सुविधा मिळतील याची राज्य सरकारने खात्री करावी. यावर पंजाबचे ॲटर्नी जनरल गुरमिंदर सिंग यांनी डल्लेवाल यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती न्यायालयात दिली.
गुरमिंदर सिंग म्हणाले, त्यांनी वैद्यकीय चाचण्या करून घेण्यास नकार दिला आहे. परंतु, त्यांचे सर्व महत्त्वाचे अवयव व्यवस्थित काम करत आहेत. तसेच सरकारच्या वतीने त्यांना १७ डिसेंबर रोजी चर्चेसाठी निमंत्रित केले होते. परंतु आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचे मन वळवण्यासाठी दररोज प्रयत्न करत आहे, असा युक्तीवाद केला.
दुसरीकडे विविध मागण्यांसाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी आंदोलकांनी रेल्वे रुळावर बसून आंदोलन केले. यामुळे पंजाबमधील रेल्वे सेवा प्रभावित झाली. संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने ‘रेल रोको’ची हाक दिली होती. दरम्यान, 6 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 14 डिसेंबरला दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी पायी जाण्याचा तीन प्रयत्न केला होता. परंतु, हरियाणाच्या सीमेवरच त्यांना रोखण्यात आले.





