आमचं नाणं खणखणीत – आढळराव पाटील

निमगाव येथे नारळ फोडून आमदार गोरेंच्या प्रचाराचा शुभारंभ
राजगुरूनगर – खऱ्या अर्थाने खेड तालुक्याचा विकास आमदार सुरेश गोरे यांनी केला आहे. आमचं नाणं खणखणीत आहे. सुरेश गोरे हेच पुन्हा बहुमताने निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेचे संपर्कनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निमगाव (ता. खेड) येथे व्यक्त केला.
महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी (दि. 9) श्रीक्षेत्रनिमगाव येथे श्री खंडोबा मंदिरात आढळराव पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आला, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, आरपीआयचे संतोष नाना डोळस, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, जिल्हा संघटक विजया शिंदे, खेड पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, सदस्या ज्योती आरगडे, सुनिता सांडभोर, रुपाली कड, अंकुश राक्षे, अमर कांबळे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, विजयसिंह शिंदे पाटील, किरण मांजरे, सूर्यकांत मुंगसे, अशोक खांडेभराड, सुरेश चव्हाण, प्रकाश वाडेकर, नंदा कड, माऊली कटके, माजी सरपंच अमर शिंदे पाटील, पांडुरंग बनकर, सरपंच बबनराव शिंदे, शंकर राक्षे, मारुती सातकर, बापुसाहेब थिटे, केशव आरगडे, मोहन वाडेकर विविध गावाचे सरपंच शाखाप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार गोरे म्हणाले की, खेड तालुक्याच्या गावागावांत विकास केला आहे. चाकणच्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या देण्यासाठी रोजगार मेळावे घेऊन तब्बल तीन हजार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. तालुक्यातील रस्ते, पाणी, आरोग्याच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या. पाच वर्षांत अनेक चांगली कामे केली. तालुक्याचा सर्वांगीण विकास-सर्वांसाठी विकास करण्याचा प्रयत्न आहे.धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले आहेत, उर्वरित लवकर सुटतील. तालुक्यातील गुंडगिरीला पाच वर्षांत थारा दिला नाही. तालुक्याच्या विकासाला खरी गती शिवसेना-भाजपमुळे मिळणार असल्याने शिवसेना-भाजपच्या मागे जनतेने ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
…तर आम्हालाही वेगळा निर्णय घ्यावा लागेल
खेड तालुक्यात अपक्ष उमेदवार उभा आहे. युती धर्मात पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात सर्वत्र महायुती असताना खेडमध्ये अशी परिस्थिती का आहे? मित्र पक्षाचा तांडा अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी असले तर आम्हालाही वेगळा निर्णय घ्यावा लागेल. अतुल देशमुख यांना आवाहन करायचे आहे की, तुम्ही हे करून कोणाचा फायदा करणार आहेत. ज्यांनी 10 वर्षांत जनतेला त्रास दिला त्याला निवडून आणायचे आहे का असा सवाल? माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.





