Otur Koyta Attack : परीक्षाकेंद्रात खळबळ! जुन्या वादातून विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला; पाच जण ताब्यात
Otur Koyta Attack : ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील धक्कादायक प्रकार; वार हातावर झेलल्याने विद्यार्थ्याचा जीव वाचला, ५ अल्पवयीन ताब्यात.
Updated On:

Otur Koyta Attack – श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रात एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर वर्गात घुसून कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असला तरी त्याने वार हातावर झेलल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळी सुमारे सव्वादहा वाजण्याच्या सुमारास, पेपर सुरू होण्यापूर्वी घडली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परीक्षा केंद्रात एकच खळबळ उडाली असून ओतूर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर ओतूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अल्पवयीन मुख्य आरोपीसह आणखी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील संभाव्य गंभीर प्रकार टळल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडील कोयता जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.





