“..अन्यथा एक कोटी रुपयांचा दंड” सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबांच्या पतंजलीला झापले

नवी दिल्ली – ऍलोपथीच्या औषधांच्या संदर्भात बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजली (Patanjali) आयुर्वेदच्या भ्रम निर्माण करणाऱ्या जाहिरातींवरून सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारच्या सुनावणीत पतंजलीला फटकारले आहे. जर त्यांच्या उत्पादनांबाबत त्यांनी अशाच प्रकारे भ्रामक जाहिरातबाजी सुरू ठेवली तर त्यांना 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाईल, अशी तंबीच न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्या. प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने दिली. (supreme court)
पतंजलीने (patanjali Case) भविष्यात अशा कोणत्याही जाहिराती करू नयेत आणि पत्रकार परिषदांमधूनही भ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत आणि या सगळ्या प्रकारापासून लांबच राहावे, असे न्यायालयाने त्यांना निर्देश दिले. भविष्यातही या सगळ्या प्रकाराला आयुर्वेद विरुद्ध ऍलोपथी असा रंग दिला न जाण्याची सूचनाही न्यायालयाने केली. इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजलीच्या विरोधात ही याचिका दाखल केली होती. पतंजली भ्रामक जाहिरातींच्या माध्यमातून ऍलोपथीच्या औषधांबाबत चुकीचा समज तयार करत असल्याचा आरोप आयएमएने याचिकेत केला होता. पतंजलीकडून केल्या जात असलेल्या कोणत्याही दाव्यांची पुष्टी होत नाही आणि ते ड्रग्ज अँड अदर मॅजिक रेडिमेड ऍक्ट 1954 व कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 या कायद्यांचे उल्लंघन आहे, असेही त्यांनी म्हटले होते. आता पुढची सुनावणी 5 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. (Ramdev Baba)
काय आहे प्रकरण?
कोरोनील आणि स्वसारी या आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून करोनावर इलाज केला जाऊ शकतो असा दावा पतंजली आयुर्वेदने केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर त्यावेळीही आयुष मंत्रालयाने त्यांना फटकारले होते. ही जाहिरातबाजी करणे थांबवा, असे निर्देश त्यांना देण्यात आले होते. त्यावेळी आयुर्वेद विरुद्ध ऍलोपथी अशी चर्चा आणि वाद सुरू झाला होता आणि आयएमएने न्यायालयाचे दार ठोठावले होते. (Ramdev Baba’s Patanjali)
डॉक्टरांची एक टोळी करते आहे अपप्रचार
डॉक्टरांची एक टोळी सनातनी मूल्यांच्या विरोधात अपप्रचार करत आहे, असा आरोप करत योगगुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा वैद्यक क्षेत्राशी संघर्षाची भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर रामदेव यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत पतंजलीची बाजू मांडली. ते म्हणाले की, आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदर करतो. तथापि, आम्ही अपप्रचार किंवा खोटा प्रचार करत नाही.
ते पुढे म्हणाले की, डॉक्टरांच्या एका टोळीने एक अशी संस्था बनवली आहे की ती योग, आयुर्वेद आणि आपल्या सनातन मूल्यांच्या विरोधात आहे. लीव्हर आणि किडनीशी संबंधित अनेक समस्यांवर कोणताच इलाज नाही, असा दावा ते करतात आणि हा तो खोटा प्रचार आहे.





