मालदीव-चीनमधील जवळीक वाढली

बीजिंग : मालजीवमधील पायाभूत सुविधा आणि नवीकरणीय उर्जा प्रकल्पांमध्ये सहकार्य द्यायला चीनने मान्यता दिली आहे. मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी ही माहीती दिली आहे. चीनच्या दौऱ्यावर चीनमधीलचायना इंटरनॅशनल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अध्यक्षांशी आपली चर्चा झाली आणि यावेळी मालदीवमधील महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे जमीर यांनी सांगितले.
दोन्ही देशांमध्ये हेतूविषयीच्या सामोपचारांच्या पत्रांची आदान प्रदान झाल्याचेही त्यांनी सांगितले. चीन आणि मालदीव दरम्यानच्या महत्वाच्या प्रकल्पांमधील सहकार्यामुळे मालदीवला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. भविष्यात अधिक महत्वाच्या प्रकल्पांबाबत देखील एकत्रितपणे काम करण्याचे मान्य केले गेले असल्याचे देखील जमीर यांनी सांगितले.
अध्यक्ष मुइज्झू यांच्या विकास धोरणासाठी चीनकडून वित्त पुरवठा मिळवण्याबाबत देखील सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. चीन आणि मालदीवमधील जवळीक भारतासाठी चिंतेची बाब आहे. मुइझ्झू अध्यक्ष झाल्यापासून मालदीवने भारताऐवजी चीनबरोबरच्या संबंधांना विशेष प्राधान्य दिले आहे.





