Paithani saree : आता ओरिजनल पैठणीवर येणार बारकोड; ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आयडिया
ओरिजनल पैठणी म्हणत, सेमी पैठणी आणि डुप्लीकेट पैठणी बाजारात विकली जाते. मात्र, आता याच सेमी पैठणी आणि ओरिजनल पैठणीतील फरक स्पष्ट होणार आहे.

Paithani saree – ओरिजनल पैठणी म्हणत, सेमी पैठणी आणि डुप्लीकेट पैठणी बाजारात विकली जाते. मात्र, आता याच सेमी पैठणी आणि ओरिजनल पैठणीतील फरक स्पष्ट होणार आहे. राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने त्यासाठी शक्कल लढवली असून ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार आहे.
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी याबाबत माहिती दिली आहे. सावकारे यांनी विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेतले. यावेळी पंढरपूर- मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पैठणी म्हणजे महिलांच्या सौंदर्य खुलवणारे वस्त्रभूषण आहे, खेळ पैठणीच्या माध्यममातूनही पैठणी हा वस्त्रअलंकार घराघरात पोहोचला आहे. तसेच, सणासाठी, लग्नासमारंभासाठीही पैठणीची वेगळीच क्रेझ महिला वर्गात पाहायला मिळते.
ग्राहकांना खरी पैठणी ओळखता यावी यासाठी आता पैठणीवर एक बारकोड आणि लोगो बनवण्याचा प्रयत्न वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सुरू आहे.
त्यामुळे, पैठणी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होणार नाही. आज पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असता सावकारे यांनी सांगितले की, खऱ्या पैठणीची ओळख होण्यासाठी बारकोडच्या माध्यमातून कोणता धागा वापरलाय, कोणत्या गावात कोणत्या कारागिरांनी ही पैठणी तयार केली याची संपूर्ण माहिती ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे बनावट पैठणी ओळखता येणार आहे. पैठणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे पैठणीला मागणी खूप आहे, तो एक कलेचा भाग आहे, एक पैठणी तयार करायला 20 ते 30 दिवस एवढा कालावधी कारागिरांना लागतो.
पैठणीचे उत्पादन वाढवण्यासाठी कामगारांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सुद्धा विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सावकारे यांनी सांगितले.





