Pune News : विश्वकर्मा ग्रुपतर्फे ‘विश्व अनुभूती २.०’चे आयोजन; उत्सव… प्रगती, संस्कृती आणि राष्ट्र उभारणीचा !

पुणे : पुण्यातील विश्वकर्मा ग्रुपतर्फे शैक्षणिक उत्कर्षासाठी ओळखला जाणारा ‘विश्व अनुभूती २.०’ या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष कार्यक्रम १२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजल्यापासून विश्वकर्मा विद्यापीठ (VU) कॅम्पसच्या ओपन अरेनामध्ये पार पडणार आहे.
‘विश्व अनुभूती २.०’ हा कार्यक्रम प्रेरणा, उत्सव आणि संस्मरणीय क्षणांनी भरलेला असेल. या कार्यक्रमादरम्यान प्रतिष्ठित व्यक्ती, प्राध्यापक, समस्त कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आणि पाहुणे एकत्र येऊन विश्वकर्मा ग्रुपच्या विविध संस्थांचा उल्लेखनीय विकास, त्यांचे योगदान, जागरुकता आणि राष्ट्र उभारणीच्या मूलभूत मूल्यांवर चर्चा करतील.
विश्वकर्मा ग्रुपचा प्रवास १९८३ मध्ये शिक्षणाद्वारे व्यक्तींना संधी निर्माण करण्यावर भर देऊन सुरू झाला. गेल्या काही वर्षांत या ग्रुपने अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, आर्ट आणि डिझाइन, कला, विज्ञान, वाणिज्य इत्यादी विविध क्षेत्रांत शैक्षणिक संस्था स्थापन करून आपली व्याप्ती विस्तारली आहे.
या सर्व संस्था व्यक्ती व समुदायांचा विकास घडवून आणण्यासाठी आणि उज्ज्वल, समृद्ध समाजाच्या उभारणीसाठी आजही योगदान देत आहेत.विश्व अनुभूती या कार्यक्रमाची थीम शिक्षण आणि सांस्कृतिक एकात्मतेद्वारे वैयक्तिक आणि राष्ट्रीय विकास वाढीस चालना देणारा सामूहिक दृष्टीकोन प्रतिबिंबित करते.
तसेच सर्व जीवन शक्तींच्या परस्परसंबंधांचे प्रतीक असणाऱ्या पंच महाभूतांच्या शिकवणींवर हा कार्यक्रम आधारित असून, ही तत्त्वे विश्वकर्मा ग्रुपच्या अस्तित्त्वाला आकार देतात आणि समाजासाठी मूल्य-आधारित वाढ निर्माण करण्यासाठीदेखील मार्गदर्शन करतात. शिक्षण, ऊर्जा, आरोग्य, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा यांचा राष्ट्रनिर्माण आणि समाजाच्या प्रगतीसाठी असलेला महत्त्वाचा वाटा अधोरेखित करणे, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
‘विश्व अनुभूती २.०’ दरम्यान मान्यवर वक्त्यांचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. यात ‘इनसाइड चाणक्याज माईंड’ आणि ‘चतुर चाणक्य अँड द हिमालयन प्रॉब्लेम’ या पुस्तकांचे प्रसिद्ध लेखक डॉ. राधाकृष्णन पिल्लई आर्य चाणक्य यांच्या कालातीत तत्त्वांबद्दल मार्गदर्शन करतील. शिवाय समारंभात ग्रुपच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीकोनावर श्री. भरत अग्रवाल आणि सौ. तृप्ती अग्रवाल आपले विचार मांडतील.
शिक्षण व समाजोन्नतीबद्दल असलेली विश्वकर्मा ग्रुपची बांधिलकी त्यांच्या संस्थांमध्ये प्रतिबिंबित होते. यात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे (VIT, Pune), विश्वकर्मा विद्यापीठ (VU), विस्डम वर्ल्ड स्कूल (WWS) आणि विश्वकर्मा इंटरनॅशनल (VI) यांसारख्या आघाडीच्या संस्था समाविष्ट आहेत.
याशिवाय, उत्पादन, किरकोळ व्यवसाय आणि सॉफ्टवेअर सेवांच्या माध्यमातूनही विश्वकर्मा ग्रुप आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीस हातभार लावत आहे. ‘एक विश्वकर्मा, एक कुटुंब’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम गेल्या वर्षातील यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी, वर्तमानाशी संलग्न होण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्याचा पाया घालण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे.





