सामान्यजण शाळेत तर गर्भश्रीमंत घरात

मांडवगण फराटामध्ये होम क्वारंटाइनमध्ये भेदभाव
शिरूर – मांडवगण फराटा येथे करोना रुग्ण सापडल्यानंतर गावात अधिक खबरदारी म्हणून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस सक्तीने क्वारंटाइन करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, आरोग्य विभाग व आपत्कालीन निवारण समितीकडून देखरेख केली जात आहे. एकूण 17 जणांपैकी फक्त 2 जणांना हायस्कूल शाळेत क्वारंटाइन तर उर्वरित 15 जणांना स्वतःच्या घरी क्वारंटाइन करण्यात आले आहे. हा क्वारंटाइनचा भेदभाव प्रशासनाने का केला, असा सवाल सर्वसामान्यांतून उमटत आहे.
होम क्वारंटाइन स्वीकारली आणि शिस्त पायदळी तुडवली. दि.27 मे रोजी करोना रुग्ण आढळल्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेतली होती. परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर गावात बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. रेड झोनमधून आलेल्या नागरिकांनी घरात न थांबता गावात पाहिजे तसा स्वैरसंचार केला असल्याची चर्चा गावभर सुरू आहे. नागरिकांनी आपल्या सोयीनुसार होम क्वांटाइन स्वीकारले आहे. त्यातच शिस्त पायदळी तुडवली आहे. पॉझिटिव्ह रुग्णानेही सर्वच गावाला धोक्यात टाकले आहे.
गावकऱ्यांचा जीव टांगणीला
सात दिवसानंतर पुन्हा एकदा करोना तपासणी गरजेची आहे. पुढील पाच ते 10 दिवस गाव व परिसर मोठ्या काळजीत आहे. गावामध्ये येणाऱ्या रस्त्यावर चेक पोस्ट तयार केले आहेत. बाहेरून आलेल्या नागरिकांची नोंद घेतली जात आहे. नवीन येणाऱ्यांसाठी कडक अंमलबजावणीचे धोरण ग्रामपंचातीने आखले आहे. गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद घेतली जात आहे. हा संसर्ग होऊ नये, अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.





