Pimpri : अतिउच्चदाब केंद्रासाठी शासकीय जमीन उपलब्ध करण्याचे आदेश

देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू येथे महावितरणाच्या अतिउच्चदाब उपकेंद्रासाठी शासकीय गायरान जमिन (सर्वे नंबर ९७) त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भ्रमणध्वनीवरून दिले, तसेच पाठपुरावा करीत केलेल्या निवेदनावर स्वाक्षरी केल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे यांनी दिली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या तीर्थक्षेत्रात दरवर्षी तीन मोठ्या यात्रा भरत असतात आणि राज्यभरातून दररोजChandrashekhar हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. देहूचे शहरीकरण वाढत असल्याने विद्युत पुरवठ्यावर भार वाढला आहे, तसेच सतत होणाऱ्या खंडित विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
याबाबत मागील काळात महावितरणाच्या उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी अर्जाद्वारे पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदार यांच्याकडे मागणी केली होती. स्थानिक चौकशी करून हवेली महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला. त्यावरून देहू विठ्ठलनगर येथील जमीन अतिउच्चदाब केंद्रासाठी उपलब्ध करता येईल, असा अभिप्राय प्राप्त झाला होता.
तथापि, अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने सुहास गोलांडे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित जमीन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.





