पुणे – पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांत पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. यात पुढील 72 तासांसाठी पुणे, साताऱ्यासह कोल्हापूर परिसराला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या काळात खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
“आयएमडी’च्या जीएफएस मॉडेलनुसार, “पुढील 24 तासांमध्ये बंगालचा उपसागरच्या पश्चिम मध्य आणि वायव्य भागात चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. हे क्षेत्र वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाने पुढील 72 तासांत कोकणासह पश्चिम किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही भाग, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि ओडिशा या भागांत दि. 25-28 जुलै या काळात पावसाची शक्यता आहे.
राज्यात कोकण-गोवा, किनारपट्टी भाग, घाट विभागात जोरदार ते अतिवृष्टीचा अंदाज आहे. तर, मराठवाड्याच्या बहुतांश भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित आहे. तर, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार वृष्टीचा अंदाज आहे. पुणे आणि परिसरात पुढील 3 दिवस हलक्या ते मध्यम, तर लगतच्या घाट क्षेत्रांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.