अमेरिकेशी कराराबाबत आशावाद वाढला

नवी दिर्ल्ली – अमेरिकेने भारताबरोबर व्यापार करार विषयक सहाव्या फेरीची बोलणी करण्यासाठी भारतात शिष्टमंडळ पाठविले नाही. अजूनही शिष्टमंडळ येण्याबाबत संदिग्धता कायम आहे. तरीही या शुल्काचा परिणाम झालेली विविध मंत्रालये नजीकच्या भविष्यात अमेरिकेसोबत व्यापार करार होण्याबाबत आशावादी आहेत.
या मंत्रालयाच्या अधिकार्यांनी सांगितले की, आम्हाला वाणिज्य मंत्रालयाकडून लवकरच व्यापार करार होईल असे संकेत मिळत आहेत. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच भारताबरोबर चांगला व्यापार करार होईल असे आपल्याला वाटते अशी पोस्ट समाज माध्यमावर केली आहे.
त्यामुळे हा आशावाद आणखीच वाढला आहे. ट्रम्प यांनीही बोलणी लवकरच सुरू होणार आहेत असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात याबाबत दोन्ही देशांदरम्यान कसलाही संवाद नसल्याचे समजले जाते. ट्रम्प यांनी याच पोस्टमध्ये लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता ही सूचित केली आहे.
मोदी आणि ट्रम्प यांच्या दरम्यान जानेवारी महिन्याच्या शेवटी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान व्यापार करार करण्याचे ठरले होते. यासाठी चर्चेच्या पाच फेर्या झाल्या होत्या. सहावी फेरी 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान होणार होती.
काळामध्ये भारत रशियाकडून तेल खरेदी करीत असल्यामुळे अमेरिकेने भारताविरोधात 50 टक्के आयात शुल्क लावल्यानंतर ही प्रक्रिया थांबली आहे. मात्र दरम्यानच्या काळात वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी वेळोवेळी भारत- अमेरिकेत दरम्यान संपर्क कायम असून लवकरच व्यापार करार होईल असे सांगितले आहे. दरम्यान ट्रम्प आणि मोदी यांनी समाज माध्यमावर केलेल्या वक्तव्यामुळे उद्योग जगतात आणि शेअर बाजारात समाधानाचे वातावरण पसरले आहे.





