पुणे | कांदा-बटाटा विभागात फळविक्री आडत्यांचा विरोध

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मार्केट यार्डातील कांदा बटाटा विभागात फळ विक्रीस परवानगी देण्याची मागणी काही आडत्यांकडून करण्यात येत आहे. बाजार समिती परवानगी देण्याच्या तयारीत असल्याची बाजार घटकात चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर या निर्णयाला कांदा बटाटा आणि फळ विभागातील आडत्यांनी तीव्र विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विभाग केले आहेत. विभाग विस्कळीत झाल्यास शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे.
त्यामुळे या निर्णयाला आडत्यांनी विरोध केला आहे. आडते असोसिएशनच्या चार संचालकांना सहीने कांदे बटाटे विभागांनी या निर्णयास विरोध असल्याचा अर्ज बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांना दिला आहे.
उद्या (बुधवार दि. ९) फळ विभागात आडते स्वत: हजर राहून या निर्णयाला विरोध करणारा अर्ज करणार प्रशासनाकडे देणार आहेत.
फळ बाजारातील आाणि कांदा बटाटा विभागातील काही आडत्यांनी यासाठी बैठक घेतली. याप्रसंगी श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे सचिव करण जाधव, उपाध्यक्ष सौरभ कुंजीर, संचालक रोहन जाधव, राजु होले, किशोर कुंजीर, नितीन कुंजीर, किशोर लडकत, संदीप खैरे, सोनू ढमढेरे यांच्यासह अन्य आडते उपस्थित होते.
बाजार समिती सभापती, संचालक मंडळ आणि सचिवांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आपल्या बाजार आवारामध्ये सुरुवातीपासूनच प्रामुख्याने फळे, फुले, तरकारी विभाग, कांदा-बटाटा-लसूण विभाग, गुळ आणि भुसार अशी विभागवार रचना केली आहे.
ही रचना मोडल्यास शेतकरी वर्गाचेही अपरिमित नुकसान होणार आहे. त्यामुळे बाजाराच्या रचनेमध्ये कोणताही बदल करु नये. या विरोधात तीव्र लढा दिला जाईल. कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असा इशाराही आडत्यांनी बाजार समितीला यावेळी दिला आहे़
कांदा बटाटा विभागातील काही आडत्यांनी फळांचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे.
हा अर्ज संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. मात्र, बैठक तहकुब झाली आहे. त्यामुळे तीन दिवसांनी होणाऱ्या बैठकीत संचालक मंडळ बैठकित याबाबत निर्णय घेईल. – डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे बाजार समिती




