पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांचे पुत्र निशांत राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र, त्यांच्या राजकारणातील संभाव्य एन्ट्रीला जेडीयूमधूनच विरोध होऊ लागला आहे. बिहारमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. तो राजकीय रणसंग्राम विचारात घेऊन ५० वर्षीय निशांत वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी सज्ज होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशात नितीश यांच्या निवासस्थानी होळी साजरी करण्यात आली. त्यावेळी निशांत यांच्या समवेत फोटो काढण्यासाठी जेडीयूच्या नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच सुरू होती. त्यामुळे निशांत यांच्याविषयीच्या चर्चांना आणखीच खतपाणी मिळाले. त्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी जेडीयूचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार भगवानसिंह कुशवाहा यांना नितीशपुत्राच्या राजकारण प्रवेशाविषयीचा प्रश्न विचारला. त्यावर काहीशा संतापानेच कुशवाहा यांनी उत्तर दिले. निशांत राजकारणात आल्यास नितीश आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यात फरक उरणार नाही, असे ते म्हणाले. जेडीयूच्या कुठल्याही महत्वाच्या नेत्याने किंवा प्रवक्त्याने निशांत यांच्याविषयी वक्तव्य केलेले नाही. केवळ प्रसारमाध्यमांमध्येच चर्चा आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. लालूंचे पुत्र आणि कन्या राजकारणात आहेत. त्यामुळे राजकीय प्रतिस्पर्धी लालूंवर घराणेशाहीचा आरोप करतात. कुशवाहा यांनी प्रतिक्रिया देताना थेट उल्लेख टाळला असला तरी घराणेशाहीच्याच मुद्द्यावर बोट ठेवल्याचे मानले जाते.