विलीनीकरण, खासगीकरणाला विरोध; बॅंक कर्मचाऱ्यांकडूनही संपाची हाक

पुणे – केंद्र सरकारच्या सरकारी बॅंकांसंदर्भातील विविध धोरणांना बॅंक कर्मचारी संघटनांनी वेळोवेळी विरोध केला आहे. मात्र, आपल्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याचे सांगून बॅंक कर्मचाऱ्यांनी बुधवारी एक दिवसाचा संप केल्यामुळे बॅंकांच्या कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला. यात रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयातील कर्मचारीही सहभागी झाले होते.
या संपामध्ये ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन ऑल इंडिया (एआयबीईए), बॅंक ऑफिसर्स असोसिएशन, बॅंक कर्मचारी सेना महासंघ आदी संघटनांनी भाग घेतला. केंद्र सरकारच्या एकूणच कामगारविरोधी धोरणाविरोधात केंद्रीय कामगार संघटनांनी एक दिवसाचा संप जाहीर केला होता. या संपालाही बॅंक कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देत सहभाग नोंदविल्याचे बॅंक कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले.केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरण करत आहे.
बॅंकांचे भागभांडवल विकून त्यांना खासगी स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे. विविध सेवा शुल्कातही वाढ केली जाते. याला कर्मचारी संघटनांचा विरोध आहे, असे एआयबीईएचे सरचिटनीस समीर घोष यांनी सांगितले.





