निसर्गाच्या अद्भुत घटनेचा आनंद घेण्याची संधी

गुरुवारी पुण्यात खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार
सूर्यग्रहण 26 डिसेंबर : सकाळी 8 ते 11.30 वा.
पुणे – सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यात नियमितपणे होणाऱ्या प्रकाश आणि सावलीच्या लपंडावामुळे 2019 वर्षाच्या अखेरीस जगभरात अनेक ठिकाणी आणि दक्षिण भारतातील काही भागांत कंकणाकृती सूर्यग्रहण तर, भारताच्या इतर अनेक भागांत खंडग्रास सूर्यग्रहण येत्या गुरुवारी (दि. 26 डिसेंबर) सकाळी पहायला मिळणार आहे. या संधीचा योग्य तो उपयोग करून निसर्गाच्या अद्भुत घटनेचा आनंद आणि अनुभव घ्या, असे आवाहन “आयुका’ने केले आहे. पुण्यात खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे.
तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करा
सूर्यग्रहण असो वा नसो, सूर्याकडे थेट उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक आहे. सूर्यग्रहण पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित सोलर फिल्टर्स असलेले चष्मे घालण्याचा किंवा प्रोजेक्शन पद्धत वापरून सूर्यग्रहण पाहण्याचा आग्रह धरा. सुरक्षित सौर चष्मे किंवा तज्ज्ञांनी सूचवलेल्या सुरक्षित पद्धतीनेच कुणीही, कोणत्याही ठिकाणावरून सूर्यग्रहणाचा आनंद लुटू शकतो, यात शंका नाही.
सूर्योत्सव-सूर्यग्रहण साजरे करा!
सूर्यग्रहण बद्दल अनेक चुकीचे समज, गैरसमज आपल्या समाजात प्रचलित आहेत. असाधारण खगोलीय घटनाक्रमामुळे सूर्यग्रहण घडून येते आणि ही एक अनोखी नैसर्गिक घटना आहे. त्यामुळे सूर्यग्रहणाबद्दल असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर व्हाव्यात म्हणून सुरक्षित साधनांच्या साहाय्याने सूर्यग्रहणाचा आनंद लुटण्यासाठी सर्व नागरिकांनी, शिक्षणसंस्था, सामाजिक संस्था आणि विज्ञानप्रेमी लोकांनी एकत्र यावे असे आवाहन “आयुका’तर्फे करण्यात येत आहे.
भौगोलिक स्थानानुसार सूर्याच्या ग्रहणाची तुम्हाला दिसणारी स्थिती अवलंबून असते. तुम्ही भारतात कोणत्या ठिकाणी राहता त्यावर तुम्हाला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार का खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार हे अवलंबून आहे.
महाराष्ट्रातील निवडक ठिकाणच्या खंडग्रास सूर्यग्रहण स्थिती :
पुणे 78%, मुंबई 79%, सोलापूर 81%, कोल्हापूर 84%, नाशिक 74%, नागपूर 62%, जळगाव 68%, औरंगाबाद 74%, अकोला 68%.
खंडग्रास सूर्यग्रहण संबंधित शहरात काही कार्यक्रम
“नवनिर्मिती लर्निग फाउंडेशन’ने गुरुवारी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी “सूर्यग्रहणासोबत चहापान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी 8 ते 11 या वेळेत बालगंधर्व जवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सूर्यग्रहणासोबत चहापान होणार आहे. यावेळी ग्रहण पाहण्याचे चष्मेही उपलब्ध करून दिले जातील. “आज भारताचे यान चंद्रावर जात असताना चंद्राच्या सावलीची भीती सोडून दिली पाहिजे. या अवकाशीय घटनेचा आनंद घेण्यासाठी जरूर यावे,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे. या कार्यक्रमासाठी कोणतेही शुल्क नाही.
त्याचबरोबर खगोलशास्त्र बदल नागरिकांमध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी भारतातील सर्वात जुन्या संस्थांपैकी एक “ज्योतिर्विद्या प्रतिष्ठान’ने सुद्धा या दिवशी सूर्यग्रहण दर्शनाचे डेक्कन परिसरात आयोजन केले आहे. तसेच, ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया (एएसआय) या भारतातील खगोलशास्त्राच्या सार्वजनिक प्रसाराचे काम करणाऱ्या संस्थेच्या पुढाकाराने “सूर्योत्सव’ साजरा करण्यासाठी देण्यात आलेली माहिती लिंकवर उपलब्ध आहे.





