Operation Tiger: ऑपरेशन टायगरला मावळचे खासदार साक्षीदार
Operation Tiger: श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात झाले इनकमिंग

Pimpri : नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या ऑपरेशन टायगरचे नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.
तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या घडामोडींमध्ये सहभागी होत ऑपरेशन टायगरचे साक्षीदार बनले आहेत. या सहा खासदारांनी एका रात्रीत पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला नाही.
तर गेल्या दहा महिन्यांपासून याबाबत विचारविनिमय सुरू होता अशी माहिती खासदार बारणे यांनी दिली. दिल्लीमध्ये संसदेत अनेकवेळा या खासदारांसोबत भेटी-गाठी होत होत्या.
अनेकवेळा जेवणासाठी व नाश्त्यासाठी हे खासदार एकमेकांना भेटत होते. तेव्हापासूनच हे सहा खासदार आणि श्रीकांत शिंदे व श्रीरंग बारणे यांच्यामध्ये या चर्चा होत होत्या. यापैकी एकाही खासदाराला पक्षात येण्याबाबत बळजबरी केली नसल्याचा खुलासा बारणे यांनी केला. ते खासदार त्यांच्या मनाने आले आहेत.
राज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत धुरा सांभाळत आहेत. त्यांचे नेतृत्व या खासदारांनी मान्य केले आहे. तसेच त्यांनाही त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करायची आहेत. शेवटी विकासकामे करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच कामी येणार हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी निर्णय घेतला असल्याचे बारणे यांनी सांगितले.
तर, दहा महिन्यामध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेला देखील याची कुणकुण लागली होती. त्यांच्यामधीलच एक खासदार याबाबत बोलले असल्याचा गौप्यस्फोट बारणे यांनी केला. ते म्हणाले, दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या ऑपरेशन टायगरबाबत उबाठाच्या नेतृत्वाला देखील माहिती मिळाली होती.
त्यामुळे एक खासदार मला आमचे काही लोक तुमच्याकडे येणार आहेत असे म्हणाले होते. दहा महिन्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील अनेकवेळा या खासदारांशी चर्चा केली. त्यावेळी मी देखील होतो. त्यामधून त्यांचे मनपरिवर्तन झाले आणि अखेर त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला.
मंत्रीपद मिळणार का?
शिवसेना पक्षाचे संसदेत खासदार वाढल्याने आता पक्षाला मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता श्रीरंग बारणे यांना मंत्रीपद मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, याबाबत पक्षनेतृत्व योग्य तो निर्णय घेईल. नेतृत्वाने नेहमीच कार्यकर्त्याच्या भावनेचा विचार केला आहे. त्यामुळे यावेळी देखील योग्य निर्णय घेत संधी मिळेल अशी भावना बारणे यांनी व्यक्त केली आहे.






