Operation Sindoor : “आम्ही झुकणार नाही, थांबणार नाही” – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई – भारतीय सैन्याची ताकद ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दाखवून दिली आहे. तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आम्ही आमच्या सैन्याचे आभार मानण्यासाठी एकत्र जमलो आहोत. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आम्हाला कोणीच झुकवू शकत नाही, आम्ही झुकणार नाही, थांबणार नाही, थकणार नाही हे सैन्याने दाखवून दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दहशतवाद्यांविरोधातील भारतीय लष्कराचे ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी ठरले. या ऑपरेशनची माहिती देशभरात पोहोचवण्यासाठी भाजपाकडून तिरंगा यात्रा काढली जात आहे. १३ मे ते २३ मे या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपाने मुंबईतही भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ ऑगस्ट क्रांती मैदान ते स्वराज्य भूमी, गिरगाव चौपाटी येथे तिरंगा यात्रा काढली. या यात्रेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे अनेक नेते आणि हजारो मुंबईकर सहभागी झाले आहेत.
पाकिस्तानमध्ये जिथे दहशतवाद्यांसाठी सेफ हाऊस तयार केले होते, तिथेच भारतीय सैन्याने जाऊन त्यांना यमसदनी पाठवले. सर्व अड्डे उद्ध्वस्त केले. तुम्ही कुठेही गेलात तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही, घुसून मारू हे भारतीय सैन्याने दाखवून दिले. पाकिस्तानचा एकही हल्ला यशस्वी होऊ शकला नाही याचा मला सार्थ अभिमान आहे.
पाकिस्तानला युद्धबंदी करायची असेल तर त्यांनी आमच्यासमोर गुडघे टेकावेत असे भारताने सांगितले. सैन्य अधिकाऱ्यांनी फोन करून आम्हाला विनंती करावी तरच आम्ही युद्धबंदी करू असे देखील सांगितले आहे.
विनंती केल्यानंतर ही युद्धबंदी झाली. भारतीय सैन्याची ताकद जगाला पाहायला मिळाली. भारतीय सैन्य अभेद्य आहे. सैन्याच्या शौर्याच्या सन्मानासाठी, भारताची ताकद जगाला दाखवण्यासाठी ही तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले.





