Operation Sindoor : पाकिस्तानला घेरणार! सुप्रिया सुळे अन् श्रीकांत शिंदेंसह खासदारांची टीम परदेशात जाणार ‘ऑपरेशन सिंदूर’ची यशोगाथा जगाला सांगणार!

Operation Sindoor : पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार सर्वपक्षीय खासदारांचे सात शिष्टमंडळ परदेशात पाठवणार आहे. विशेष बाब म्हणजे या खास मोहिमेचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्याकडं सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
या प्रत्येक टीममध्ये पाच खासदार असतील. यापैकी एक खासदार गटाचे नेतृत्व करेल. संसदीय कामकाज मंत्रालयाने शनिवारी टीम नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जेडीयूचे संजय कुमार झा, द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादी (सपा) च्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीकांत एकनाथ शिंदे गटाचे नेतृत्व करतील.
मोहिमेचा नेमका उद्देश काय?
खासदारांचे शिष्टमंडळ या महिन्याच्या अखेरीस जगातील प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) सदस्य देशांना भेट देणार आहे. तेथे ते ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताचा दृष्टिकोन स्पष्ट करतील. खासदारांचे पथक ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानविरुद्ध का आणि कसे कारवाई केली हे स्पष्ट करेल.
तसेच पाकिस्तानच्यावतीनं दहशतवादाला सातत्यानं समर्थन दिलं जात असल्याची बाब आंतरराष्ट्रीय समुदयासमोर आणली जाणार आहे. यामध्ये विशेष रुपानं भारताच्यावतीनं नुकतंच सुरु करण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूरची देखील माहिती दिली जाणार आहे. हा केंद्र सरकारचा या मोहिमेमागील उद्देश आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, या मोहिमेत सहभागी झालेल्या खासदारांचा दौरा २३ मे पासून सुरु होणार आहे, ही मोहिम १० दिवस चालणार आहे.
देशाचा प्रश्न येतो तेव्हा आपण सर्वजण एकत्र असतो : सुप्रिया सुळे
याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, खासदारांच्या प्रत्येक पथकात पाच सदस्य असतील, जे सुमारे दहा दिवसांच्या दौऱ्यावर 5 ते 8 देशांना जातील. 23 किंवा 24 मे रोजी शिष्टमंडळ निघण्याची शक्यता आहे. ‘पंतप्रधान मोदींनी स्थापन केलेल्या खासदारांच्या टीम ऑपरेशन सिंदूरबाबत जगासमोर भारताची बाजू मांडतील. जेव्हा आपल्या देशाचा प्रश्न येतो तेव्हा आपण सर्वजण एकत्र असतो आणि इतर देशांमध्ये जाऊन आपल्या देशाची बाजू मांडतो, असं सुळे म्हणाल्या.





