Operation Sindoor : “त्याच रात्री पाकिस्तानचा काटा काढला असता तर…”; पंतप्रधान मोदींच मोठं वक्तव्य

Operation Sindoor – जेव्हा जेव्हा पाकिस्तानशी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा तेव्हा भारताच्या लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानला पराभूत केले. पाकिस्तानला हे माहिती आहे की, ते समोरासमोरच्या युद्धात भारताला हरवू शकत नाहीत. म्हणूनच ते प्रॉक्सी वॉरचा अर्थात दहशतवादी कारवायांचा अवलंब करत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, शरीर कितीही मजबूत किंवा निरोगी असले तरी, एक काटा सतत वेदना देऊ शकतो. म्हणून आम्ही ठरवले आहे की, काटा काढावा लागेल. फाळणीच्या वेळी भारतमातेचे दोन भाग झाले. त्याच रात्री मुजाहिदीनने काश्मीरवर पहिला दहशतवादी हल्ला केला. जर त्यांना त्यावेळी संपवले असते, तर ७५ वर्षांचे हे दुखणे टाळता आले असते.
सरदार पटेल यांनी पीओके परत मिळेपर्यंत सैन्य परत येऊ नये, अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांचे म्हणणे मान्य झाले नाही. या मुजाहिदीनच्या तोंडाला रक्त लागले होते. ही प्रवृत्ती गेल्या ७५ वर्षांपासून सुरू आहे. पहलगाम हला हाही त्याचाच एक भाग होता.
मोदींनी गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे ५,५३६ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. मोदी म्हणाले, मी दोन दिवसांपासून गुजरातमध्ये आहे. काल मी वडोदरा, दाहोद, भूज, अहमदाबाद येथे होतो आणि आज गांधीनगरमध्ये होतो.
मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे गर्जना करणारा सिंदूर समुद्र आणि फडफडणारा तिरंगा मला दिसला; लोकांच्या हृदयात मातृभूमीबद्दल अपार प्रेम आणि देशभक्तीची लाट मी पाहिली. हे दृश्य फक्त गुजरातमधील नाही, तर ते भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आहे, ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे.
सर्व काही कॅमेया-समोर
ऑपरेशन सिंदूरच्या त्या रात्रीची आठवण करून देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा २२ मिनिटांत ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले गेले त्यावेळी सर्व काही कॅमेऱ्यासमोर करण्यात आले. यावेळी कोणीही आमच्याकडे पुरावा मागू नये, म्हणून आम्ही सर्व व्यवस्था केली होती. मी हे यासाठी म्हणत आहे, कारण ६ मे नंतर मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानने राजकीय सन्मान दिला होता.
त्यांच्या शवपेटीवर पाकिस्तानी झेंडे लावण्यात आले होते. त्यांच्या सैन्याने दहशतवाद्यांना सलाम केला आणि यावरून हे सिद्ध होते की, हे प्रॉक्सी युद्ध नाही तर ते एक विचारपूर्वक आखलेले धोरण आहे आणि तुम्ही युद्ध लढत आहात. तुम्हाला याचे उत्तरदेखील असेच मिळेल.





