Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या 16 जवानांचा शौर्य पदकांनी सन्मान
Operation Sindoor – सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) १६ जवानांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत. ऑपरेशन सिंदूरवेळी उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना सन्मानित केले जाणार आहे. केंद्र सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरूवारी शौर्य पदकांची घोषणा केली.
त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे रक्षण करणाऱ्या बीएसएफ या निमलष्करी दलाच्या लक्षणीय कामगिरीवर शिक्कामोर्तब झाले. ऑपरेशन सिंदूरवेळी बीएसएफचे २ जवान शहीद, तर ७ जवान जखमी झाले. त्या माेहिमेवेळी बीएसएफने पाकिस्तानचे देखरेख कॅमेरे उद्धवस्त केले. तसेच, त्या देशाकडून होणारे ड्रोन हल्ले उधळून लावले.
त्यामध्ये सहभागी असणाऱ्या जवानांची कामगिरी शौर्य पदकांमुळे अधोरेखित झाली. व्यास देव, सुद्दी राभा, अभिषेक श्रीवास्तव, ब्रिजमोहन सिंह, दिपेश्वर बर्मन, भुपेंद्र वाजपेयी, राजन कुमार, बसवराज शिवप्पा सुंकदा, रविंद्र राठोड, देवीलाल, साहिब सिंह, कन्वराज सिंह, उदयवीर सिंह, राजप्पा बीटी, मनोहर आणि अलोक नेगी या अधिकारी, जवानांना शौर्य पदकांनी सन्मानित केले जाईल. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांना ऑपरेशन सिंदूरवेळी बीएसएफने समर्थ साथ दिली.





