ChatGPT च्या निर्मात्यावर बहिणीने केला लैंगिक शोषणाचा आरोप, स्पष्टीकरण देत म्हणाला…

OpenAI CEO Sam Altman : ओपनएआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमनवर त्याच्याच बहिणीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. सॅमने 1997 ते 2006 या काळात वारंवार लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक आरोप अॅन ऑल्टमनने केला आहे. याबाबत तिने न्यायालयात खटला देखील दाखल केला आहे.
चॅटजीपीटीमुळे सॅम ऑल्टमन हे नाव सर्वांना परिश्चित झाले आहे. सॅम सीईओ असलेल्या ओपनएआय कंपनीद्वारेच चॅटजीपीची निर्मिती करण्यात आली आहे. या आरोपानंतर तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सॅम ऑल्टमनची बहिण असलेल्या अॅनने आरोप केला आहे की, ती 3 वर्षांची होती व भाऊ 12 वर्षांचा असल्यापासून लैंगिक शोषण करत आहे. सॅम प्रौढ झाला व ती 11 वर्षांची होईपर्यंत हे सर्व सुरू होते. आठवड्यातून अनेकवेळा लैंगिक शोषण केले जात होते. यामुळे तिला गंभीर स्वरुपाच्या भावनिक, मानसिक त्रासाला व नैराश्याचा सामना करावा लागला. याचा परिणाम आजही होत आहे.
बहिणीच्या आरोपावर सॅम ऑल्टमनने दिले स्पष्टीकरण
अॅनने केलेल्या आरोपांवर सॅम ऑल्टमनने स्पष्टीकरण दिले आहे. संपूर्ण ऑल्टमन कुटुंबाच्या वतीने याबाबत भूमिका मांडण्यात आली आहे. एक्सवर (ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये ऑल्टमनने म्हटले आहे की, माझे कुटुंब अॅनवर प्रेम करते. तिच्या आरोग्यासाठी आम्ही खूप चिंतित आहोत. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करणाऱ्या कुटुंबातील सदस्याची काळजी घेणे, हे आव्हानात्मक असते. अशाच प्रकारच्या संघर्षाचा सामना करत असलेले कुटुंब ही बाब नक्कीच समजू शकतात.
ऑल्टमन यांनी सांगितले की, त्याचे कुटुंब मागील अनेक वर्षापासून अॅनची मदत करत आहे. बिल, भाडे, मेडिकल खर्च, नोकरी व घर खरेदीपर्यंत प्रत्येकबाबतीत तिची मदत केली आहे. अॅन मागील अनेक वर्षांपासून पैशांची मागणी करत आहे. तसेच, आरोप पूर्णपणे खोटे असल्याचेही ऑल्टमनने पोस्टमध्ये म्हटले आहे.
आम्ही तिच्या आणि आमच्या गोपनीयतेचा आदर करून सार्वजनिकपणे कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सॅमवर कायदेशीर कारवाई केली आहे. त्यामुळे आम्हालाही यावर कारवाई करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.





