Satara: सातारा पालिकेच्या चार प्रभागांना खुल्या प्रवर्गाची लॉटरी

सातारा, दि. ८ (प्रतिनिधी)- सातारा नगरपालिकेच्या 25 प्रभागांची आरक्षण सोडत बुधवारी येथील शाहू कलामंदिरामध्ये काढण्यात आली. प्रभाग क्रमांक 7, 14, 20 आणि 22 या चार प्रभागांमध्ये खुल्या प्रवर्गाची आरक्षणे जाहीर झाल्याने येथे जोरदार मोर्चेबांधणी पाहायला मिळणार आहे. याशिवाय इतर मागास प्रवर्गासाठी 14 प्रभाग तर अनुसूचित जातीसाठी सहा व जमातीसाठी एक असे प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत.
साताऱ्याचे प्रांताधिकारी आशिष बारकुल व पालिका प्रशासक अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शाहू कलामंदिराच्या व्यासपीठावर ही आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्यात आली. अभिजित बापट यांनी आरक्षण सोडतीची माहिती दिली. निवडणूक निरीक्षक मोहन प्रभुणे यांनी सोडतीची प्रत्यक्ष प्रक्रिया पार पाडली.
नगरपालिका शाळेतील मुलींच्या व मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. प्रथम नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सोडतीद्वारे एकूण 14 प्रभाग आरक्षित झाले. त्यातील 5, 6, ९, 10, 11, 18 व 24 हे प्रभाग महिलांसाठी राखीव झाले. तर 12, 16, 17, 19, 21, 23 व 25 या प्रभागांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे आरक्षण पडले.
प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आला होता. या प्रभागात महिला उमेदवाराला लॉटरी लागली असून यंदादेखील या प्रभागातून महिला उमेदवारच प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
प्रभाग दोन, तीन, चार, आठ, १३ व 15 हे सहा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले असून यापैकी 4, 8, 13 हे प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. या आरक्षण सोडतीनंतर नगरसेवकांमध्ये काही खुशी काही गम अशी परिस्थिती निर्माण झाली. काहींची अपेक्षापूर्ती झाली तर काहींचा भ्रमनिरास झाला आहे. येत्या काळात बऱ्याच राजकीय घडामोडी या प्रभाग आरक्षणानंतर घडणार आहेत.
आरक्षण सोडत प्रक्रिया सुमारे दोन तास सुरू होती. अभिजित बापट प्रत्येक टप्प्यावर आरक्षण प्रक्रियेची माहिती देऊन त्यानुसार नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात येत होती. प्रभाग क्रमांक 7, 14, 20 आणि 22 या चार प्रभागांत सर्वसाधारण आरक्षणे पडली आहेत. त्यामुळे सर्वात जास्त चुरशीचे सामने या चार प्रभागात पाहायला मिळणार आहेत.
नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक
सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना राजकीय संवेदनशीलता लक्षात घेऊन येथे उमेदवार द्यावे लागणार आहेत. नगराध्यक्षपदाचे आरक्षणही सर्वसाधारण खुले पडल्यामुळे बहुतांश माजी नगरसेवक थेट नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत असणार आहेत. त्यामुळे नगरसेवक पदाकडे अनेकांचा कल कमी असून आपणच काम केल्याचा दावा करत नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे अनेकांनी सांगितले. शाहूपुरी, शाहूनगर, विलासपूर या हद्दवाढीतील नव्या भागांचा आरक्षित प्रभागात समावेश झाल्याने हद्दवाढ भागातही मोठी राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे.





