IIT Delhi Convocation : “जो शिकत राहील, तोच जिंकेल”, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींचा सल्ला
IIT Delhi Convocation : ५८७ पीएचडी संशोधकांसह ३,००० हून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी बहाल

IIT Delhi Convocation : दिल्लीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या म्हणजे आयआयटीच्या ५७ व्या पदवीप्रदान समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना आपल्यातील उत्सुकता आणि शिकण्याची वृत्ती नेहमी जिवंत ठेवण्याचा सल्ला दिला.
बदलत्या जगात तंत्रज्ञानाचा वेग वाढत असून आव्हानांचे रूपांतर संधींमध्ये करण्याचे धैर्य बाळगा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
सेमीकंडक्टर क्षेत्राचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या या पावलांवर सुरुवातीला काहींनी शंका उपस्थित केली होती. मात्र, आज पहिल्या सेमीकंडक्टर युनिटमध्ये प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे. भविष्यात मायक्रोचिपपासून ते मोठ्या जहाजांपर्यंत सर्व गोष्टी भारतीय तरुणांच्या हातांनीच तयार होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘जो शिकत राहील, तोच जिंकेल हे सत्य कायम राहील’
“जागतिक स्तरावरील सत्तासंतुलन वेगाने बदलत असून त्यामागे तंत्रज्ञानाची गती हे मुख्य कारण आहे. पुढील २० ते ३० वर्षांत जग कसे असेल हे सांगता येत नसले, तरी जो शिकत राहील, तोच जिंकेल हे सत्य कायम राहील.
देश प्रत्येक क्षेत्रात – आर्थिक, तांत्रिक आणि औद्योगिकदृष्ट्या – आत्मनिर्भर होण्यासाठी काम करत आहे. येत्या ३०-३५ वर्षांत तरुणांचे प्रत्येक पाऊल आणि निर्णय देशाच्या विकसित भारत या ध्येयाला आकार देईल,” असेही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
या पदवीदान समारंभात ५८७ पीएचडी संशोधकांसह ३,००० हून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात आल्या. आयआयटी दिल्लीत सुरू करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नवीन उपक्रमांचे कौतुक करत पंतप्रधानांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा:






