तरच करोनामुळे निर्माण झालेल्या संधीचा फायदा घेता येईल ; सीतारामन

चेन्नई – भारतीय उद्योगांनी करोना व्हायरसचा योग्य प्रकारे मुकाबला केला आहे. त्यामुळे भारताचा विकास दर दीर्घकाळ जास्त प्रमाणात कमी झाला नाही. करोनामुळे जसे काही प्रश्न निर्माण झाले तसे भविष्यात बऱ्याच संधी निर्माण होणार आहेत.
या संधीचा फायदा घेण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार आणि उद्योगादरम्यान विश्वास महत्वाचा आहे असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
भारतीय उद्योग महासंघाचे आयोजित केलेल्या उद्योजकांच्या बैठकीत बोलताना सीतारामन म्हणाल्या की, करोना व्हायरसचा मुकाबला आपण सध्याच्या परिस्थितीत योग्य प्रकारे केला आहे.
मात्र आगामी काळात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्यात येणार आहेत. मोठ्या शहराबरोबरच छोट्या शहरातही या पायाभूत सुविधा वाढविण्याबद्दल विचार करण्यात येत आहे. त्या कामी सरकारला खासगी क्षेत्राच्या मदतीची आवश्यकता आहे.
सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी वेळेत करोनाची लस देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे जवळजवळ निम्म्या लोकांचे लसीकरण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाकांक्षी निर्गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आलेले आहे. त्यातून सरकारला निधी मिळण्याची अपेक्षा असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार दोन सरकारी बॅंका आणि एका विमा कंपनीचे खासगीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
या वर्षी निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 1.75 लाख कोटी उभारण्याचा संकल्प सरकारने केला आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले. आयडीबीआय बॅंक, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, शिपिंग कार्पोरेशन इत्यादी कंपन्यातील सरकार आपले भाग भांडवल विकणार आहे.
त्याचबरोबर डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन उभारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून ही संस्था लवकरच कार्यरत होईल. त्यामुळे देशातील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी 111 लाख कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्राला भांडवल उभारणीस मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लघु उद्योगासह कोणत्याही क्षेत्राला भांडवल कमी पडणार नाही, याची काळजी रिझर्व बॅंकेच्या मदतीने घेण्यात येत आहे. बॅंका, बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था आणि म्युच्युअल फंडातून ही रक्कम उपलब्ध होण्याचा मार्ग 15 ऑक्टोबरपासून खुला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.





