वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – मावळ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच मंगळवार, दिनांक २२ ऑक्टोबर सकाळी ११ वाजलेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झालेला आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला मावळ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी सोमवारी (दि.२१) वडगाव मावळ येथे पत्रकार परिषद घेतली. तहसीलदार कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला सुरेंद्र नवले यांसह तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार मंगळवारपासून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी उमेदवारी अर्ज देणे, स्वीकारणे, प्रशासनाची तयारी याबद्दल सविस्तर माहिती दिली. उमेदवारासोबत फक्त चार जणांना कक्षात प्रवेश उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. दिनांक २९ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात उमेदवार आणि त्यांच्या सोबत जास्तीत जास्त चार व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. याखेरीज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयापासून शंभर मीटर आवारात अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या परिसरात उमेदवारांसोबत जास्तीत जास्त तीन वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर स्वीकारणार अर्ज मावळ तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याकरिता आवश्यक संगणक, कर्मचारी, टेबल आदी व्यवस्था करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांसाठी प्राथमिक सुविधा उपलब्ध केली असून नामनिर्देशन पत्राची प्राथमिक पडताळणी केली जाईल. तसेच शंभर रुपयांचे स्टॅम्प बंद झाल्यामुळे पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाईल. विविध परवानगी बाबत एक खिडकी व्यवस्था सुरू केली असून विहित मुदतीत परवानगी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या सहा तक्रारी मावळ विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या सहा तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या निकालात काढून संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मतदारसंघात अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, फलकांवर कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना फक्त ६ दिवस विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता निवडणूक आयोगाने दिनांक २२ ते २९ ऑक्टोबर असा एकूण ८ दिवसांचा कालावधी जाहीर केला असला तरीही प्रत्यक्षात अर्ज भरण्यासाठी सहा दिवस मिळणार आहेत. शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर आणि रविवार, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच बहुतांश उमेदवार हे दिनांक २४ ऑक्टोबर नंतर उमेदवारी अर्ज भरतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.