जिल्हा परिषदेत फक्त अजित पवारांचीच सत्ता! राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश, मुंबईत ठरणार रणनीती

प्रभात वृत्तसेवा
नारायणगाव – जिल्हा परिषदेमध्ये अजित पवारांची एकहाती सत्ता असली पाहिजे. मित्रपक्ष बरोबर असले तरी आपला पक्ष एक नंबर आला पाहिजे. भारतीय जनता पार्टी जर ’शत प्रतिशत’ चा नारा देत असेल, तर तो राष्ट्रवादी पक्षाला म्हणण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्ष आपली संघटना वाढविण्याचा प्रयत्न करीत असतो. राष्ट्रवादीला आपला पक्ष वाढवायचा असून त्यासोबत नेत्याची ताकद वाढवायची आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
नारायणगाव येथे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते. यावेळी माजी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष गणपत फुलावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अॅड. संजय काळे, पुणे जिल्हा कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक बाळासाहेब खिलारी, विद्यमान संचालक भाऊसाहेब देवाडे, पापा खोत, उज्वला शेवाळे, सुप्रिया लेंडे वैष्णवी चतुर, अक्षदा मांडे, पुष्पा गोसावी, शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
भविष्यात अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, असे छातीठोकपणे कोणी सांगू शकतो का? कारण राजकारणाची दोलायमान स्थिती आहे. म्हणूनच ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. व्यक्तिगत स्वार्थापेक्षा, पक्ष व नेता श्रेष्ठ आहे. कार्यकर्ता समंजस व शिस्तीचा असला पाहिजे, उमेदवारी मिळाली नाही तरी त्याने पक्षनिष्ठा सोडता कामा नये. बंडखोरी होता कामा नये. सत्तेपेक्षा संघटनेची ताकद सर्वाधिक असते. कारण संघटना गोरगरिबांना न्याय देऊ शकते, तेवढा न्याय प्रशासन देऊ शकत नाही.
कार्यकर्त्यांना जबाबदारी द्यावी..
पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासारख्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुक ज्या इच्छुक उमेदवारांना लढवायच्या असतील त्यांनी तातडीने फॉर्म भरून द्यावेत. पक्षांमध्ये लोकशाही असली पाहिजे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत प्रभागामध्ये पक्षाला मानणारे जे पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुक लढविण्यास इच्छुक नाहीत त्यांच्यावर जिल्हा परिषद गट व गणाची जबाबदारी द्यावी.
मुंबईला बैठक..
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 7 नोव्हेंबरला मुंबई येथे मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाच्या पंधरा निवडक नेत्यांची, कार्यकर्त्यांची जिल्हा व तालुका निहाय विचार सभा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित असणार आहे. यावेळी चर्चेत उपस्थितांनी निवडणुकी संदर्भात स्पष्ट विचार मांडून नेत्यांचा होकार घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्या तालुक्यात सोयीचे राजकारण करावयाचे आहे.





