एका महिन्यात फक्त 7 कोटी रुपये थकबाकी वसूल

नगर -थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी शंभर टक्के शास्ती माफी दिल्यानंतरही महापालिकेच्या तिजोरीत फक्त 7 कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान मनपा प्रशासनासमोर उभे राहिले आहे. मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी थकीत मालमत्ता कर वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
प्रभाग अधिकारी व वसुली अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच थकाबाकी वसूल होण्यासाठी शंभर टक्के शास्ती माफीही दिली. यानंतर थकबाकीदार प्रतिसाद देतील आणि थकबाकी मोठ्या प्रमाणात वसूल होईल असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र वसुलीस थकबाकीदारांचा कमी प्रतिसाद मिळत आहे.
26 जुलै ते 24 ऑगस्ट या काळात फक्त 7 कोटी रुपये वसुली झाली आहे. त्यानंतर 31 ऑगस्टनंतर उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी जप्ती कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील मालमत्ताधारकांकडे थकीत संकलित कराची एकूण 230 कोटी रुपये थकबाकी आहे. थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याप्रमाणात वसुली होत नसल्याचे याआधीही दिसून आले आहे. त्यामुळे शास्ती सवलतीनंतरही कर वसुलीला प्रतिसाद मिळालेला नाही.





