पुणे | बीबीए, बीसीएसाठी फक्त ३३ टक्के प्रवेश

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाचे फक्त ३३ टक्के प्रवेश झाल्याची माहिती समोर आली आहे. शेवटच्या फेरीअखेर केवळ ३४ हजार ५२९ जागांवरच प्रवेश झाले आहेत. त्यामुळे अद्यापही या अभ्यासक्रमाच्या ७३ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे हे अभ्यासक्रम प्रवेशाअभावी बंद होण्याची भीती संस्थाचालकांतून व्यक्त होत आहे.
यंदापासून बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम अभ्यासक्रमांचे प्रवेश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अखत्यारित होत आहेत. त्यानुसार राज्य सीईटी सेलने सर्व महाविद्यालयांना प्रवेश करण्याचे निर्देश दिले आहे.
राज्य सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्याबाबत माहिती नव्हती. काही महाविद्यालयांनी या अभ्यासक्रमांच्या नावात बदल केला. त्यामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात बीबीए, बीसीए या दोन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून १ लाख ८ हजार उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी केवळ ४१ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यातील ३४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामध्ये बीबीए १७ हजार १०७, तर बीसीए १७ हजार ४२२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
असे असल्याचे एकूण जागांच्या उपलब्ध क्षमतेपेक्षा ६७ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, तिसऱ्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवरील प्रवेश प्रक्रिया संस्थास्तरावर राबविण्याची परवानगी सीईटी सेलने दिली आहे. मात्र, या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जाची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे बंधन महाविद्यालयांना घातले आहे.
राज्य सीईटी सेलने आगामी शैक्षणिक वर्षासाठी बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करून, त्याचा प्रचार आणि प्रसार करावा. विद्यार्थी, पालकांसाठी शैक्षणिक मेळावे आयोजित करून त्यांना माहिती द्यावी. त्याचप्रमाणे सीईटीसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना दोनदा सीईटी देण्याची संधी मिळावी.- प्रा. शामकांत देशमुख, कार्यवाह, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी
खासगी विद्यापीठांचे प्रवेश फुल्ल
बारावीचा निकाल यंदा मे महिन्यात जाहीर झाला. गेल्या वर्षीपर्यंत बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कॉलेजस्तरावर पूर्ण व्हायची. या वेळी प्रवेश प्रक्रियेस फारच दिरंगाई झाली. त्याचा फटका पारंपरिक विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेला बसला. मात्र, दुसरीकडे प्रक्रियेतील दिरंगाईमुळे राज्यातील खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश फुल्ल झाल्याचे चित्र दिसून आले.





