अवघ्या २५ किमी अंतरासाठी मुख्यमंत्र्यांनी वापरलं हेलिकॉप्टर; CMO ने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

पंजाब – केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे दिल्लीला गेले होते. यावेळी मुख्यमंत्री चन्नी यांनी अवघ्या २५ किमी अंतरासाठी सरकारी हेलिकॉप्टरचा वापर केला आहे. यावरुन त्यांना विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
दिल्लीला जाण्यासाठी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना मोहाला विमानतळावर पोहचायचे होते. मुख्यमंत्री निवासस्थानापूसन अवघ्या २५ किमी अंतरावर मोहाली विमानतळ आहे. मुख्यमंत्र्यांनी २५ किलोमीटर प्रवासासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी २५ किलोमीटर प्रवासासाठी हेलिकॉप्टरचा वापर का केला? असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला आहे.
यावर पंजाब मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. चार्टर्ड प्लेन पकडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरचा वापर केला. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे वेळ खूप कमी होता. त्यासाठी मोहाली आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाण्यासाठी चन्नी यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाजवळील राजिंदर पार्क येथून सरकारी हेलिकॉप्टर वापरत मोहालीला पोहचले. असे CMO ने सांगितले आहे.





