पुण्यात फक्त 0.35% करोना चाचण्या

लोकसंख्येच्या तुलनेत लागण झालेला आकडा फक्त 0.05 टक्के
पुणे – शहरात करोनाबाधितांचा आकडा दोन हजारांच्या घरात गेला असला, तरी शहराच्या ठराविक भागातच हा आजार वाढत आहे. त्यामुळे फक्त त्याच भागातील संशयितांच्या करोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत आहेत.
महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटी यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील 33 लाख 1 हजार 896 लोकांपैकी आतापर्यंत 11 हजार 649 जणांच्या करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हा चाचण्यांचा आकडा अवघा 0.35 टक्के आहे. यात करोना संसर्ग झालेल्या व्यक्तींचे प्रमाण हे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत फक्त 0.05 टक्के असल्याचे समोर आले आहे.
शहरात सर्वाधिक 1,340 चाचण्या या ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झालेल्या आहेत. त्यात, सुमारे 234 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्या पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण असलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 1146 जणांची करोना तपासणी झाली असून, त्यात 278 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्या खालोखाल कसबा- विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 1137 जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यात 133 जणांना करोनाची बाधा झाली आहे.
तर येरवडा कळस-धानोरीत सुमारे 1046 जणांची करोना तपासणी झाली असून त्यात 166 जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. तर सर्वात कमी 186 तपासण्या कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झाल्या असून त्यात केवळ 3 करोना बाधीत आढळले आहेत. तर औंध- बाणेरमध्ये 259 तपासण्यांमध्ये 4 बाधित सापडले असून, वारजे- कर्वेनगर परिसरात 197 तपासण्यांमध्ये 9 बाधित सापडले आहेत. तर सिंहगड रस्ता परिसरात 300 तपासण्यांमध्ये 11 जण बाधित सापडले आहेत.





