पिंपरी (प्रतिनिधी) – टाटा मोटर्स आणि इनव्हायर्नमेंटल कन्झर्व्हेशन असोसिएशन (ईसीए) यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे कुटुंबनिहाय पाणी वापर तपासण्यास सुरवात केली आहे. “सर्व्हे मंकी’ या संस्थेच्या मदतीने हे सर्वेक्षण केले जात आहे.
महापालिकेच्या वतीने सध्या शहरामध्ये दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. सुमारे 490 दशलक्ष लिटर इतके पाणी पवना धरण क्षेत्रातून उचलले जात आहे. शहरात विविध भागांमध्ये विशेषत: सोसायट्यांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे बऱ्याच सोसायटीधारकांना टॅंकरने पाणी मागवावे लागत आहे. तसेच, तळे, विहीर, बोअरवेल आदींच्या पाण्याचाही नागरिक वापर करीत आहेत. त्याशिवाय, रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पावसाचे पाणी साठवून त्याचाही काही सोसायट्या वापर करीत आहेत. त्यामुळे महापालिका पुरवित असलेल्या पाण्यापेक्षा आधिकचे पाणी शहरवासियांना लागत आहे.
ही बाब लक्षात घेऊन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या सहमतीने हे सर्वेक्षण सुरू केले आहे. प्रश्नावलीवर आधारित या सर्वेक्षणातून प्रत्येक कुटुंबाचा सरासरी पाणी वापर काढला जाणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल महापालिका प्रशासनाला सादर केला जाणार आहे. सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या सर्वांना डिजिटल सहभागपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती ईसीएचे अध्यक्ष विकास पाटील यांनी दिली.