मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाइनच नोंदणी; शासनाकडून आदेश जारी

मुंबई : मंत्रालयीन प्रवेशासाठी सरकारने आता ऑनलाईन प्रवेश प्रणाली सुरू केली असून डीजी प्रवेश पास असल्याशिवाय तुम्हाला मंत्रालयात एंट्री मिळणार नाही. राजधानी मुंबई हे महाराष्ट्राचे मुख्यालय म्हणता येईल, विधिमंडळ, सचिवालय आणि मंत्रालय या महत्त्वाच्या आणि प्रशासकीय व प्रमुख संस्था मुंबईत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मंत्रालयात नागरिक, राजकीय नेतेमंडळी, आमदार, खासदार, पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रमुख भेटी देत असतात. स्थानिक आणि जिल्हा पातळीवर आपली कामे रखडल्यानंतर संबंधित व्यक्ती वा संस्था मंत्रालयाचे दार ठोठावत असते.
मात्र, आता मंत्रालयाचे दार सहजपणे ठोठावता येणार नाही. मंत्रालयात येणा-या सर्व अभ्यागतांना आता केवळ डिजिटल प्रवेश पत्राद्वारेच प्रवेश देण्यात येईल. डिजीप्रवेश या ऑनलाईन अॅप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळविता येणार आहे. येत्या १५ ऑगस्टपासून ही नवी कार्यप्रणाली लागू केली जात आहे. अभ्यागतांकडे मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
अशिक्षीत तसेच स्मार्टफोन नसलेल्या अभ्यांताकरीता गार्डन गेट येथे ऑनलाईन अॅप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश नोंदणीकरीता तसेच मदतीकरीता एक खिडकी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे, आता मंत्रालयात यायचे असेल तर नागरिकांना डिजिटल व्हावे लागणार आहे. ११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या गृह विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. त्यानुसार, यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेली मॅन्युअली प्रवेश पास देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे.





