शेतकऱ्यांना ऑनलाईन तारण कर्ज

मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाताना काही अडचणी किंवा योग्य किंमत मिळत नसल्यास महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक करावी. या प्राप्त गोदाम पावतीवर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने तारण कर्ज देण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, ही नाविन्यपूर्ण योजना प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी प्रथमत: राबविण्यात येत आहे. यासाठी मिळणारा प्रतिसाद पाहून इतर बॅंकांच्या माध्यमातूनही सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्य वखार महामंडळाची राज्यात विविध ठिकाणी गोदामे असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य तसेच शेतमाल, औद्योगिक मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येते. गोदामातील साठवणुकीवर वखार पावती देण्यात येते. सदर वखार पावती वखार अधिनियम, 1960 नुसार पराक्रम्य असून त्यावर बॅंकेमार्फत तारण कर्ज उपलब्ध होते.
वखार पावतीवर शेतकऱ्यास प्रत्यक्ष बॅंकेमध्ये जाऊन विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतू या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शेतकरी वखार महामंडळाच्या संगणकीय प्रणाली आधारे ऑनलाईन पद्धतीने बॅंकेस तारण कर्जासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करु शकतात.
तसेच शेतकऱ्यास यासंबंधिचे मोबाईल ऍप्लीकेशन डाऊनलोड करुन त्याच्या स्मार्टफोनच्या आधारे मराठीमध्ये अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. स्मार्टफोनद्वारे शेतकऱ्यास आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन पाठविता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा बॅंकेत जाण्याचा वेळ व पैसा वाचेल. पात्र शेतकऱ्यास वखार पावतीवरील शेतमालाच्या किंमतीच्या 70 टक्के कर्ज बॅंकेकडून शेतकऱ्यांच्या बॅंक खाते आरटीजीएस अथवा एनएफटीद्वारे जमा केले जाईल.
तारण कर्जासाठी व्याजदर 9 टक्के असून इतर बॅंकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा रुपये 5 लाख प्रति शेतकरी एवढी असून वखार महामंडळाकडून शेतकऱ्यास साठवणूक भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.





