RBI New Rule:ऑनलाइन फ्रॉड झाल्यास RBI कडून मिळणार 25 हजार रुपयांपर्यंत भरपाई; जाणून घ्या नवा नियम
RBI New Rule

RBI New Rule: डिजिटल व्यवहारांच्या युगात ऑनलाइन फसवणुकीचे (Online Fraud) प्रमाण वाढत असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन फसवणुकीत पैसे गमावलेल्या ग्राहकांना आता आरबीआयकडून आर्थिक मदत मिळणार असून, यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात येत आहे. या नव्या नियमानुसार, ग्राहकांना जास्तीत जास्त २५,००० रुपयांपर्यंतची भरपाई मिळू शकणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी पतधोरण बैठकीनंतर यासंदर्भातील माहिती दिली. डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करणे आणि ग्राहकांचा विश्वास वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. लवकरच या नियमावलीचा मसुदा (Draft Guidelines) जाहीर केला जाणार आहे.
भरपाईचे गणित: कसे मिळतील पैसे?
नव्या नियमानुसार, भरपाईची रक्कम दोन निकषांवर ठरवली जाईल. फसवणूक झालेल्या रकमेच्या ८५ टक्के किंवा २५,००० रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल, तितकीच मदत ग्राहकाला मिळेल.
५० हजारांचा फ्रॉड झाल्यास: ५० हजार रुपयांच्या ८५% रक्कम ४२,५०० रुपये होते. मात्र, कमाल मर्यादा २५ हजार असल्याने ग्राहकाला फक्त २५,००० रुपयेच मिळतील.
१ लाखाचा फ्रॉड झाल्यास: १ लाख रुपयांच्या ८५% रक्कम ८५ हजार रुपये होते. येथेही कमाल मर्यादेमुळे फक्त २५,००० रुपयेच दिले जातील.
२० हजारांचा फ्रॉड झाल्यास: २० हजार रुपयांच्या ८५% रक्कम १७,००० रुपये होते. ही रक्कम २५ हजारांच्या मर्यादेत असल्याने ग्राहकाला पूर्ण १७,००० रुपये मिळतील.
नियमातील महत्त्वाच्या अटी –
एकाच वेळी लाभ: ही मदत ग्राहकाला केवळ एकदाच मिळेल. वारंवार होणाऱ्या चुका टाळण्यासाठी आणि ग्राहकांनी सतर्क राहावे यासाठी ही अट घालण्यात आली आहे.
जबाबदारीची तपासणी: इलेक्ट्रॉनिक बँकिंग फ्रॉडमध्ये ग्राहकाची नेमकी चूक किती होती, याचीही तपासणी केली जाणार आहे. २०१७ च्या जुन्या नियमांचीही आता समीक्षा केली जात आहे.
फ्रॉडची धक्कादायक आकडेवारी –
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कार्ड आणि इंटरनेट फसवणुकीच्या १३,४६९ प्रकरणांमध्ये तब्बल ५.२ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याआधीच्या वर्षी हा आकडा १४.५७ अब्ज रुपयांवर होता. वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.





