Online betting: 12 कोटींची रोकड, 6 कोटींचे दागिने… ईडीच्या छाप्यानंतर काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र यांना अटक

बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. ऑनलाइन सट्टेबाजी आणि कॅसिनो व्यवसायाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. ईडीने 22 आणि 23 ऑगस्ट रोजी वीरेंद्र यांच्या बंगळुरू, हुबळी, मुंबई, जोधपूर आणि गोव्यातील अनेक ठिकाणांवर छापेमारी केली. यामध्ये गोव्यातील वीरेंद्र यांच्या पाच कॅसिनोंवरही तपासणी करण्यात आली.
ईडीच्या तपासात समोर आले आहे की, वीरेंद्र अनेक ऑनलाइन सट्टेबाजी साइट्स चालवत होते. छापेमारीदरम्यान वीरेंद्र यांच्या ठिकाणांवरून 12 कोटी रुपये रोख, यामध्ये 1 कोटी रुपयांची परदेशी चलने, 6 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 10 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. याशिवाय, अनेक लक्झरी गाड्याही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
गंगटोकमधून अटक, 30 ठिकाणांवर छापेमारी –
ईडीने वीरेंद्र यांना सिक्कीममधील गंगटोक येथून अटक केली. सूत्रांनुसार, वीरेंद्र काही सहकाऱ्यांसह गंगटोकमध्ये कॅसिनोसाठी जमीन भाडेतत्त्वावर घेण्यासाठी गेले होते. ईडीने त्यांच्या 30 ठिकाणांवर छापेमारी केली, ज्यामध्ये त्यांचे भाऊ के.सी. थिप्पेस्वामी, के.सी. नागराज आणि मुलगा पृथ्वी एन. राज यांच्या परिसरातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. तपासादरम्यान 17 बँक खाती आणि दोन बँक लॉकर्स फ्रीज करण्यात आली आहेत. ईडीच्या मते, वीरेंद्र यांचा भाऊ के.सी. थिप्पेस्वामीदेखील या प्रकरणात सहभागी आहे.
दुसऱ्या काँग्रेस आमदारावरही कारवाई –
काही दिवसांपूर्वी ईडीने कर्नाटकातील आणखी एक काँग्रेस आमदार सतीश कृष्ण सैल यांच्या घरावर आणि इतर ठिकाणांवर छापेमारी केली होती. कारवार-अंकोला मतदारसंघातील या आमदाराच्या ठिकाणांवरून 1.7 कोटी रुपये रोख आणि 6.8 किलो सोने जप्त करण्यात आले होते.
काँग्रेससाठी डोकेदुखी
कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असताना, पक्षाच्या आमदारांच्या ठिकाणांवरून सातत्याने मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि बेहिशेबी मालमत्ता सापडत आहे. या कारवायांमुळे काँग्रेस पक्षासाठी राजकीय संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ईडीचा तपास सुरू असून, याप्रकरणी आणखी खुलासे होण्याची अपेक्षा आहे.





