Chakan : कांदा साडेपाच हजार रुपये क्विंटल
Chakan : आवक घटल्याने कांद्याच्या दराला आधार मिळत असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला साडेचार हजार रुपयांच्या पुढे दर मिळत आहे.

चाकण : साठवणूक केलेल्या उन्हाळी कांद्याची आवक सध्या बाजारात होत असताना कांद्याच्या दराने पुन्हा चांगलीच उसळी घेतली आहे. बाजार समित्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला साडेचार हजार ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने कांदा उत्पादकांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. काही बाजारपेठांमध्ये कमाल दर पाच हजार रुपयांहून अधिक नोंदविला जात असल्याने आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यंदाच्या कांदा उत्पादन हंगामात नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या लहरीपणाचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे अपेक्षेच्या तुलनेत कांद्याचे उत्पादन घटले. त्यातच शेतकर्यांनी साठवणूक केलेला उन्हाळी कांदा आता टप्प्याटप्प्याने बाजारात आणला जात असल्याने बाजारातील उपलब्धता कमी होत आहे. आवक घटल्याने कांद्याच्या दराला आधार मिळत असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला साडेचार हजार रुपयांच्या पुढे दर मिळत आहे.
कांद्याच्या दरातील वाढीचा फायदा साठवणूकदार आणि व्यापार्यांना अधिक होत असल्याचे चित्र आहे. उत्पादनाच्या काळात कमी दर मिळाल्याने अनेक शेतकर्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. आता बाजारातील आवक कमी होत असताना साठवणुकीतील कांद्याला चांगला दर मिळत असल्याने साठवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. मात्र, वाढलेल्या दराचा थेट आणि अपेक्षित फायदा उत्पादक शेतकर्यांना कितपत मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.
नवीन खरीप कांद्याची आवक अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे पुढील काही आठवडे बाजारातील कांद्याचा पुरवठा मर्यादित राहण्याची शक्यता आहे. परिणामी कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता कांदा निर्णयतदार मयूर बोरा यांनी व्यक्त केली. दरम्यान, किरकोळ बाजारात कांद्याचा दर 50 ते 60 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. घाऊक बाजारातील दरवाढीचा परिणाम किरकोळ बाजारावरही जाणवत असून, सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरातील चढ-उतारावर नियंत्रणाची मागणी
कांद्याच्या बाजारभावातील सातत्याने होणार्या चढ-उतारामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फटका बसत आहे. त्यामुळे शासनाने कांद्याच्या बाजारपेठेवर लक्ष ठेवून पारदर्शक आणि स्थिर दरव्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी शेतकरी व ग्राहकांकडून होत आहे.





