नवी दिल्ली – केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर, महाराष्ट्रसह अन्यत्र शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संबंधात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांनी कांद्याच्या भावाबाबत चिंता करण्याची गरज नाही. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे, पण कोणत्याही शेतमालाला कमी भाव मिळणार नाही, याचीही हमी आहे, त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे,असे तोमर म्हणाले. केंद्र सरकारने कांदा खरेदीचे प्रमाण वाढवले आहे, त्यातुन शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु केंद्राने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची जी घोषणा केली आहे ती अत्यंत तोकडी आहे त्याचा शेतकऱ्यांना किंचितही लाभ होणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. असल्या तोकड्या उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या तोंडला पाने पुसण्याऐवजी कांदा निर्यातीवरील 40 टक्के शुल्क तातडीने रद्द करावे अशी त्यांची मागणी आहे. पण हे शुल्क रद्द करण्याच्या मागणीच्या संबंधात केंद्रीय कृषी मंत्री काहीही बोलले नाहीत.