Pimpri : मावळ तालुक्यातील पूर्व भागात कांदा लागवडीची लगबग

मावळ : मावळ तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील अनेक गावांमध्ये रब्बी कांदा पिकाच्या लागवडीची लगबग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यावर्षी रब्बी कांद्याच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता यामुळे व्यक्त केली जात आहे.
मावळ तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील इंदोरी, सुदुंबरे, सुदवडी, कुंडमळा, शेलारवाडी, कोटेश्वरवाडी, माळवाडी, वराळे, नानोली, वारंगवाडी, आंबी, तळेगाव, सोमाटणे फाटा, शिरगाव, गहुंजे, सांगावडे, दारुंब्रे, कासारसाई, गोडुंब्रे, धामणे, चांदखेड, पाचाणे, पुसाणे, परंदवडी, बेबडओहळ, शिवणे, उर्से आदी गावांमध्ये बागायती क्षेत्र असून या गावांमधील शेतकरी आता कांदा उत्पादनाकडे वळले आहेत.
मावळ तालुक्यात सर्वसाधारणपणे ३०० ते साडेतीनशे हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते, त्यात यंदा मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. १०० ते १२५ हेक्टर क्षेत्रात टोमॅटोची लागवड झालेली आहे, अशी माहिती मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी दिली.
मावळ तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमधील बागायती पिकांकरिता तळेगाव, देहूरोड, पिंपरी व मोशी येथील बाजारपेठा जवळ आहेत. त्यामुळे येथील शेतकरी भाजीपाला व अन्य पिकांचे उत्पादन घेत आहेत. सध्या पूर्व भागातील शेतकरी कांदा पिकाच्या लागवडी व मशागतीकडे लक्ष देत असून मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करीत आहेत.
– विकास गोसावी, सहाय्यक कृषी अधिकारी





