पुणे जिल्हा | कांद्यावर बळगा, करपाचा प्रादुर्भाव

वाल्हे, (वार्ताहर) – दररोजच्या वातावरणामधील बदलामुळे शेतात लावलेल्या कांदा पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. वाल्हे (ता.पुरंदर) परिसरामध्ये कांदा पिकांवर बगळा (कांद्याची मान लांब होऊन कांदा पोसत नाही) तसेच कांदा पिकांवर करपा रोग पडत असल्याने कांद्याचे पीक संकटात आले असल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे.
सध्या कांद्याचा दर वधारत असून पुरंदर तालुक्यातील शेतकरी हा नवीन कांदा लागवडीसाठी जोमाने लढत आहे. मात्र, लागवड झालेल्या कांदा पिकांवर अनेक रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे होत असलेल्या नुकसानीने बळीराजा हैराण झाला आहे.
वाल्हे येथील प्रयोगशील शेतकरी कैलास पांडूरंग भुजबळ यांनी 10 गुंठे कांद्याची लागवड मागील सव्वादोन महिन्यांपूर्वी केली होती.
मात्र, लागवड केलेले कांदा रोप अचानक आपली मान टाकत आहे. त्या रोपांची प्रतिकार शक्तीच कमी होऊन ते पूर्णपणे बसून जात आहे. हा प्रकार समजत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
असा येतो खर्च
साधारण 10 गुंठे कांदा लागवडीसाठी, कांदा बियाणे आत्ताच्या बाजारभावानुसार (प्रति एक किलो 1500 ते 2000) खर्च झाले. त्याआगोदर शेत नांगराने, सरी काढणे, सरी तोडणी आणि कांदा लागवड यासाठी 7 ते 8 हजार रुपये मजुरी गेली होती. तसेच औषधे व खते सहा हजारापर्यंत असा एकूण 10 गुठ्यांसाठी साधारण 8 हजार इतका खर्च झाला.
पाणीटंचाईचे संकट असतानाही धाडसाने खर्च केला होता; मात्र कांदा पिकांवर विविध रोग होतांना दिसत असून यासाठी औषध फवारणीचा खर्च वाढत आहे. शिवाय रात्री व अपरात्री कांद्याला पाणी देण्यासाठी डोळ्यात तेल घालून उभे राहावे लागते.
इतकी सगळी मेहनत आणी खर्च करुन शेतातील कांदा पिक शेतकरीवर्गाच्या होताला लागेल कि नाही? याची शाश्वती नाही. शासनाने या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी. – कैलास भुजबळ, शेतकरी, वाल्हे


