पुणे जिल्हा | जेऊरमधील उपद्रवी माकड जेरबंद

वाल्हे,(वार्ताहर)- जेऊर (ता.पुरंदर) परिसरात मागील काही दिवसांपासून, पिसाळलेल्या माकडाने धुमाकूळ घातला होता. यासंदर्भात ‘दैनिक प्रभात ने ‘जेऊर येथे पिसाळलेल्या माकडाचा धुमाकूळ’ असे वृत्त गुरुवार (दि.२०) जून रोजी प्रसिद्ध केली होते.
या वृत्ताची वनविभागाने दखल घेत सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपद्रवी माकडास वनविभाग व रेस्क्यू टीमच्या मदतीने पकडण्यात आले.
जेऊर येथे मागील काही दिवसांपासून, पिसाळलेल्या माकडाने गावामध्ये धुमाकूळ घातला होता.शेळ्या, वासरांवर हल्ला करणाऱ्या या माकडाने, लहान बालकांसह, महिलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली होती.
तसेच चालू दुचाकीवाहनांना लाथा मारत होते. अनेकांच्या घरांच्या कौलांचेही नुकसान केले होते. तसेच शेतातील पिकांचे नुकसान केले होते.यामुळे येथील नागरिकांनी त्रस्त होऊन, वनविभागाने या उपद्रवी माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली होती.
दरम्यान, गावाकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर वन कर्मचारी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून गेले होते. मात्र याबाबत कोणतेही दखल घेतली गेली नव्हती. यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर, दैनिक प्रभात ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करताच त्याच दिवशी वनविभागाने, रेस्क्यू टीम च्या साह्याने, गुरूवार (दि.२०) सकाळी सात वाजल्यापासून, तीन तासांच्या मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वनविभाग व रेस्क्यू टीम यांनी उपद्रवी माकडास जेरबंद केले. यामुळे येथील ग्रामस्थांनी दैनिक प्रभात ने आभार मानलेत.
यावेळी, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, वनपाल राहुल रासकर, अनिल खोमणे, गोविंद नीरडे, अक्षय लव्हाळे,परमेश्वर वाघमारे, गणेश तांबे, सोनाली कांबळे पूनम जाधव, प्रियंका गिरी व रेस्क्यु बावधन टीम यांनी पिसाळलेल्या माकडास रेस्क्यू करून नेले.
पिसाळलेल्या माकडाने, खाशाबा तांबे, पंढरीनाथ धुमाळ, पांडुरंग हाडके, परशुराम तांबे, दिपक तांबे, कुंडलिक तांबे, सदाशिव तांबे, रामदास सोनवलकर, मोहन गिरी आदी शेतकऱ्यांच्या शेळ्यांना चावा घेऊन जखमी केले आहे.
तर खाशाबा तांबे यांची शेळी दगावली आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे.
“वनविभाग आणि ‘रेस्क्यू टिम’ ने जेऊर (ता.पुरंदर) येथे धुमाकूळ घालत असलेल्या उपद्रवी माकडास, गुरूवारी सकाळी पकडून, सुरक्षित आधिवासात सोडवण्यात आले असून, नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत”. – – विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी सासवड





