Pune District : मंचर बाजारात कांद्याचे लिलाव बंद
Pune District : कांदा उत्पादकांना किमान २० रुपये प्रतिकिलो दर मिळावा, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. बैठकीत सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो दरावरही प्रश्न उपस्थित करण्यात आला.

मंचर : कांद्याच्या बाजारभावात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून सरकारने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवार, दि.२६ रोजी मंचर (ता.आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडला. यावेळी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला किमान दर द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
कांदा लिलाव बंद पाडण्याच्या अगोदर बाजार समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत कांद्याच्या सध्याच्या बाजारस्थितीवर चर्चा करत आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्रीती प्रवीण थोरात, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष धोंडीभाऊ भोर, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, मनोहर इंदोरे, गणेश यादव, संजय बढेकर, माऊली ढोमे, सचिन थोरवे यांच्यासह खेड,आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
कांदा उत्पादकांना किमान २० रुपये प्रतिकिलो दर मिळावा, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. बैठकीत सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो दरावरही प्रश्न उपस्थित करण्यात आला. हा दर जाहीर करूनही प्रत्यक्ष कांदा खरेदी झाली नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच नाशिक जिल्ह्यासाठी १५ रुपये ८० पैसे दराने कांदा खरेदीचा निर्णय सोमवार, दि.२५ रोजी रात्री जाहीर करण्यात आला असून तो संपूर्ण राज्यासाठी लागू करावा, अशी मागणी करण्यात आली.कांदा उत्पादन ते बाजारपेठ असा खर्च १५ ते १६ रुपये प्रतिकिलो होत असल्याने सध्याचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सरकारने कांदा दर वाढीचा निर्णय न घेतल्यास लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने तोट्यात जात असताना सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नाही. जाहीर केलेला दर व्यवहार्य नाही. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना समान दराने दिलासा मिळाला पाहिजे.
-धोंडीभाऊ भोर,तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.कांद्याच्या प्रश्नावर तातडीने निर्णय झाला नाही, तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकप्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी आमची भूमिका आहे.
-विशाल वाबळे,युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.





