Chakan News : एमआयडीसी मार्गावर एकेरी वाहतूक; तरीही कोंडी कायम
Chakan News : एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करूनही काही ठिकाणी वाहने संथगतीने पुढे सरकत असल्याचे दिसून येते. काही वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोंडीत आणखी भर पडते.

चाकण : महाळुंगे-चाकण एमआयडीसी परिसरातील प्रमुख मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली असतानाही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहनचालक, कामगार आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाळुंगे-चाकण औद्योगिक पट्ट्यात मोठ्या संख्येने औद्योगिक आस्थापना असल्याने दररोज हजारो कामगार, मालवाहू अवजड वाहने, खासगी वाहने तसेच दुचाकींची मोठी वर्दळ असते. वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्याची क्षमता आणि वाहतूक नियोजन मात्र त्या तुलनेत अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.
एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करूनही काही ठिकाणी वाहने संथगतीने पुढे सरकत असल्याचे दिसून येते. काही वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोंडीत आणखी भर पडते. त्यातच अवजड वाहनांची मोठी संख्या असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. वाहतूक कोंडीमुळे औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचणे कठीण होत आहे. मालवाहतूक करणार्या वाहनांनाही विलंबाचा सामना करावा लागत असल्याने उद्योगांचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. परिणामी उद्योगांसह स्थानिक नागरिकांना वेळ आणि आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्यांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, अवजड वाहनांसाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन आणि रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणे यांसारख्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी होत आहे. एकेरी वाहतूक करूनही कोंडी कमी होत नसेल, तर वाहतूक नियोजनातील त्रुटी शोधून त्या दूर करण्याची गरज आहे. प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता महाळुंगे-चाकण एमआयडीसी मार्गासाठी सर्व संबंधित यंत्रणांचा समन्वय साधून कायमस्वरूपी आणि कालबद्ध वाहतूक आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





